दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
मनसेचे नेते राज ठाकरे यांना झालंय तरी काय ?
मनसे,आगामी निवडणुकीत किती जागा लढवणार,हे अद्याप निश्चित झाले नसले तरी पक्षाचे नेते राज ठाकरे हे गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्याचे दौरे करत आहेत.नाशिक व ठाणे जिल्ह्यात त्यांचा पक्ष फार नाही,पण एखाद दोन जगावर चांगली लढत देईल.पण त्यांना जागा जिंकणे,अशक्य आहे.या निवडणुकीसाठी राज ठाकरे हे सतत दौऱ्यावर आहेत,पण त्यांना अद्याप सूर सापडलेला नाही.त्यांच्या प्रचारात कुठेतरी वैचारिक गोंधळ निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत हेच राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारासाठी मुंबई,ठाणे,कल्याण,
नाशिक व पुण्यात प्रचारात जाहीर सभा घेत होते.आज तेच राज ठाकरे महायुतीच्या कारभारावर ताशेरे ओढत सर्वत्र फिरताना दिसत आहेत,हा बदल म्हणावा कि वैचारिक गोंधळ,अशा संभ्रमावस्थेत मनसे सैनिकांसह मतदार देखील सापडले आहेत.गेल्या दोन दिवसात त्यांनी महायुतीच्या ” मुख्यमंत्री,माझी लाडकी बहीण,” योजनेवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यात त्यांच्यामध्ये झालेल्या या बदलामागे नक्की काय कारणे आहेत,हे कळायला मार्ग नाही.अशा परिस्थितीमध्ये ते ” एकला चलो रे,” भूमिकेत येऊन ही निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागतात,यामागे निश्चित एक रणनिती असावी.लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेली नेत्रदीपक कामगिरी लक्षात घेऊन शिंदे गट व भाजपने त्यांना स्वबळावर ही विधानसभा लढवण्यास भाग पाडले असावे.उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या मराठी माणसाच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी राज याना त्यांनी या निवडणुकीत उतरवले असावे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.कारण काल परवापर्यंत एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,प्रसाद लाड,आशिष शेलार,प्रवीण दरेकर,हे राज ठाकरे यांच्या इमारतीच्या गॅलरीत अधून मधून पाहायला मिळत होते.तेच राज ठाकरे आता लाडकी बहीण योजनेवरून शिंदे सरकारवर आगपाखड करू लागले आहेत.याला आपण त्यांचा वैचारिक गोंधळ म्हणायचं कि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अपशकुन करण्याची भाजप व शिंदे गटांनी आखलेली रणनिती समजायचे ? असा प्रश्न मतदारासमोर उभा ठाकला आहे.

