दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
श्रेय उपटण्याच्या नादात गृहखात्याची लक्तरे वेशीला टांगली गेली,
बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची पोलिसांकडून एन्काऊंटर झाल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये सुरू झालेली श्रेयवादाची हावरट स्पर्धा ही अत्यंत घृणास्पद अशीच होती.अक्षय शिंदे याला सजा झालीच पाहिजे,अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा होती,पण ती भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून व्हायला हवी,असे अभिप्रेत होते.पण पोलिसांनी त्याला ज्या पद्धतीने ठार मारले, त्या पद्धतीला लोकांचा विरोध आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने आमच्यावर हल्ला केला व आम्ही स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.या घटनेनंतर शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त करत पेढे वाटले.तर खा.नरेश म्हस्के यांनी शिंदे या पोलीस अधिकाऱ्याची हॉस्पिटलमध्ये जाऊन अभिनंदन केले.हे शिंदे महाशय,एक वादग्रस्त पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात.या घटनेनंतर राज्यात सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले व सरकारला चौकशी समिती नेमावी लागली.आता या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे.दरम्यान आरोपीच्या आईवडीलाने ” आमच्या मुलाची पोलिसांनी हत्या केल्या,” चा आरोप केला आहे.चौकशी समितीच्या चौकशीतून यथावकाश सत्य समोर येईलच.
पण अशा संवेदनशील प्रकरणात श्रेय उपटण्यासाठी महायुतीमधील शिंदे गट व भाजपने जो आततायीपणा केला,त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.भाजपने तर मुंबई व ठाणे शहरात ” बदला पुरा,” असे घोषवाक्य व हातात रिव्हॉल्वर घेतलेल्या देवेंद्र फडणवीस याचे छायाचित्र असलेले बॅनर्स झळकवून श्रेय उपटण्याचा अत्यंत घाणेरडा प्रकार केला.या कृतीचा उलटा परिणाम होईल,असे लक्षात आल्यानंतर सरकारने महानगरपालिकेला काढायला लावले.उशीरा का होईना,पण सरकारचे डोके ताळ्यावर आले,असेच म्हणावे लागेल.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र ज्याप्रकारे बनर्सवर झळकवण्यात आले,त्यांच्या गृहखात्याची लक्तरे वेळोवेळी कशी टांगली गेली,यावर आपण एक नजर टाकूया…
गृहमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात बलात्कार,लुटमाऱ्या,हत्या,जातीय दंगली,कोयता गँगचा धुमाकूळ,उपराजधानी असलेल्या त्यांच्या नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती,हिट अँड रनच्या वारंवार घडणाऱ्या घटना,अल्पवयीन मुलींचे अपहरण,व इतर अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत गेली.दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात एक महिला प्रवेशाचा पास नसताना थेट त्यांच्या कार्यालयाला धडक देते,यावरून दस्तुरखुद्द फडणवीस देखील सुरक्षित नाहीत,हे स्पष्ट झाले आहे.या राज्यात त्यांच्या गृहविभागाच्या निष्क्रियतेमुळे राज्यात मुली,महिला,कोणीही सुरक्षित नाहीत.बदलापूर बलात्कार प्रकरणातील संस्थाचालक व इतर पदाधिकारी पोलीसांना सापडत नाहीत,शिवाजी पुतळा प्रकरणी हवे असलेले आरोपी पोलिसांना अटक करणे शक्य होत नाही,ते स्वतःहून हजर होतात,तरीही त्यांचे कार्यकर्ते ” बदला पुरा,” असे आशयाचे बॅनर्स व त्यावर देवेंद्र फडणवीस यांचे हाती रिव्हॉल्वर घेतलेले फोटो दिमाखात झळकवतात,ही बाब आपल्या संस्कृतीची किती घसरण या भाजपने चालवली आहे,हे स्पष्ट करणारे आहे.

