दीपक मोहीते,
” रणसंग्राम,”
जागावाटपानंतर महायुतीमध्ये होणार उद्रेक,
आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला लोकसभा निवडणुकीसारखा फटका बसेल,अशा भितीतून
गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यात दौरे सुरू झाले आहेत.काल त्यांनी नागपूर येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.आज ते नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत.येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी,हे पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही या दोघांनी राज्यात सतत दौरे केले होते.पण त्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही.ज्या विदर्भात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राहतात,त्या विदर्भात भाजपची प्रचंड पीछेहाट झाल्यामुळे शहा यांनी आता विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
राज्यातील राजकीय वातावरण महाविकास आघाडीला पोषक आहे,हे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या। जोडगोळीने ठाकरे व पवार यांना रोखण्यासाठी ऍक्शन प्लॅन आखला आहे.मात्र राज्यातील राजकीय वातावरण पाहता त्यांचा हा प्लॅन यशस्वी होईल,असे वाटत नाही.तसेच गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्येही प्रचंड बेबनाव निर्माण झाल्यामुळे अमित शहा पार वैतागून गेले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुलाबी जाकीट घालून ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत फिरू लागले असून,ते कधीही आपली वेगळी चूल मांडतील,अशी शक्यता आहे.वर्षांपूर्वी शरद पवार यांना रोखण्यासाठी अमित शहा यांनी अजित पवार यांना कुरवाळले होते,पण त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला व लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांच्यासोबत भाजपलाही झिडकारले.दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्यांना महायुतीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय रुचला नाही.त्यांच्या मुखपत्राने लेख लिहून भाजपच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या.अजित पवार गटालाही पावलोपावली अपमान सहन करून महायुतीमध्ये राहण्यात त्यांना स्वारस्य उरलेले नाही.नुकत्याच झालेल्या महामंडळाच्या नियुक्त्यांमध्ये फडणवीस व शिंदे या दोघांनी अजित पवार यांचा लोटा सतरंजीवर उलटा करून ठेवल्यामुळे पवार गटाचे आमदार चांगलेच नाराज झाले आहेत.या सर्व आमदारांना अजित पवार यांनी तूर्तास सबुरीचा सल्ला दिला आहे.वरवरची शांतता दिसत असली तरी जागावाटपानंतर
महायुतीमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांचे राज्य दौरे सुरू झाले आहेत,पण ते कितपत फलदायी ठरतील,हे सांगणे कठीण आहे.

