दीपक मोहिते
राज्यात हळवे भात कापणीला सुरुवात,
राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे भाताचे पीक बऱ्यापैकी आले आहे.राज्याच्या पठारी व डोंगराळ भागात हळवे,गरवे व नीमगरवे अशा तीन प्रकारच्या भाताची लागवड करण्यात येते.सध्या हळवे भात तयार झाले असून पिकाची कापणी वेगाने सुरू झाली आहे.गरवे व निमगरवे भाताच्या कापणीला अनंत चतुर्दशीनंतर सुरुवात करण्यात येणार आहे.
दरवर्षी राज्यात मान्सून पाठशिववणीचा खेळ करत असतो,यंदा मात्र त्याने भातउत्पादक शेतकऱ्यांना नाराज केले नाही.जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचे आगमन झाल्यानंतर त्याने सलग महिनाभर हजेरी लावली.त्यामुळे शेतीची प्राथमिक व नंतरची उर्वरित कामे मार्गी लावता आली.नांगरणी,पेरणी,
लावणी व आवणीची कामे वेळेवर पार पडली.त्यानंतरच्या काळात राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली, पण ती भातशेतीला फारशी त्रासदायक ठरली नाही.हळवे भातपिके आता पोटरीत आली असून भाताच्या लोंब्या तयार झाल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली आहे.यंदा सारं काही व्यवस्थित जुळून आल्यामुळे राज्यात काही जिल्ह्याचा अपवाद वगळता शेतकरीवर्ग वरूणराजाच्या मेहेरबानीमुळे चांगलाच सुखावला आहे.गरवे व निमगरवे भाताचे पीक तयार झाले असून कापणीला येत्या चार दिवसानंतर सुरुवात करण्यात येणार आहे.मात्र पुढील काळात परतीच्या पावसाने जाताना फटका देता कामा नये,अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

