दीपक मोहिते,
” आपला आनंद हरपला,”
ठाण्यात “आनंद हरपला आहे,” ज्या आनंद मठात आनंद दिघे यांचे वास्तव्य होते,त्या खोलीत पैसे उधळण्याचा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.पैश्याचा इतका माज बरा नाही,अशा प्रतिक्रिया ठाण्यात दिवसभर उमटत होत्या.
गणेशोत्सवातील मिरवणुकीत आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर ढोल पथकांवर पैसे उधळण्यात आले.ज्या धर्मवीर आनंद दिघे यांनी आयुष्यभर संस्कार,तत्व व हिंदुत्व याची जपणूक केली,त्या दिघे यांच्या मठात असा प्रकार घडावा,हे अत्यंत दुःखदायक असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य ठाणेकरामधून व्यक्त होत आहेत.धर्मवीर आनंद दिघे याना दैवत मानतो,त्यांची आपण पूजा करतो,त्यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळणे,अत्यंत निंदनीय आहे,असे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी म्हंटलं आहे.खऱ्या अर्थाने ” आपला आनंद हरपला,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.ही घटना घडल्यानंतर स्वतःला दिघे यांचे पट्टशिष्य म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल २४ तासानंतर या घटनेवर भाष्य केले.त्यांनी पक्षाच्या त्या कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले आहे.पण त्यांच्या या कारवाईचे स्वागत करता येणार नाही.कारण ज्या आनंद मठात धर्मवीर आनंद दिघे गोरगरीब जनतेचे प्रश्न व समस्या सोडवत असत,त्या मठात अशाप्रकारचा लाजीरवाणा प्रकार होत असेल तर खरोखरच ” आनंद हरपला,” असंच म्हणावं लागेल.

