दीपक मोहिते,
अनंत चतुर्दशीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा,
गेल्या दोन महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.सध्या पाऊस ओसरल्यामुळे प्रशासन रस्त्याची दुरुस्ती व डागडुजीची कामे हाती घ्यावीत,अशी मागणी करण्यात येत आहे.पण वसई-विरार मनपाचे बांधकाम विभाग सध्या मरणासन्न अवस्थेत आहे.त्यामुळे खड्डे पडलेल्या रस्त्यावरून गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेताना गणेशभक्तांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.निदान अनंत चतुर्दशीपूर्वी तरी रस्त्यांची दुरुस्ती व्हावी,अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.तसेच या रस्त्यावरून सध्या प्रवासी वाहने चालवणे धोकादायक ठरले आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे शहराच्या पूर्वेस असलेल्या अनेक रस्त्याची पार चाळण झाली आहे.या रस्त्यावरून पादचाऱ्यांना येजा करणे,अशक्य झाले आहे.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट,पाणीचोरी, घरपट्टी घोटाळा,वसुली, नैसर्गिक नाल्यातील अनधिकृत बांधकामे,या गैरप्रकारामुळे ही महानगरपालिका राज्यात बदनाम झाली आहे.जिल्ह्यातअतिवृष्टी झाली की महानगरपालिका क्षेत्रातील चार महानगरातील रस्त्याची पार दैना उडते.शहरात पाणी तुंबून किमान तीन दिवस जनजीवन विस्कळीत होणे, साफसफाई न करणे व चार शहरातील रस्त्याची दुर्दशा, असा अनागोंदी कारभार करदात्यांच्या पाचवीला पुजला आहे.यंदा पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेने ठेकेदारांना पॅचवर्क करण्याचे ठेके दिले होते. पण ठेकेदारांनी थुकपट्टीची कामे करत महानगरपालिकेला चांगलाच चुना लावला आहे.
या सर्व ठेकेदारांना मनपा अधिकारी व राजकीय पाठबळ असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात येत असते.मनपा दरवर्षी रस्ते दुरुस्ती व नालेसफाईवर कोट्यवधी रु.ची उधळपट्टी करते.उद्या गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे,त्यानंतर पाच दिवसांनी अनंत चतुर्दशी आहे.त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करावी,अशी मागणी वसई तालुक्यातील तमाम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.

