दीपक मोहिते,
एसटी कामगारांचा संप ; आगारे ओस पडली,लोकांचे अतोनात हाल,
ऐन गणेशोत्सव सणाच्या तोंडावर राज्यातील ८० हजार एसटी कामगारांच्या संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.आठ दिवसापूर्वी एसटी कामगारांचा संप होणार असल्याचे जाहीर होऊनही राज्य सरकारने कोणतीही हालचाल केली नाही.त्यामुळे गणपतीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे आज अतोनात हाल झाले.
महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या एसटी संपाला चिथावणी देणाऱ्या महायुतीच्या नेत्यावर एकप्रकारे काळाने सूड उगवला आहे.या संपामुळे गावी जाणाऱ्यांचे आज अतोनात हाल झाले.आजच्या या संपामुळे राज्यातील ८० % एसटी आगारे ओस पडली असून एकूण ८० हजार कामगारापैकी ६७ हजार कामगार या संपात सामील झाले आहेत.गुणरत्ने सदावर्ते यांची एकमेव संघटना वगळता अन्य सर्व संघटना या संपात उतरल्या आहेत.वास्तविक सरकारने हा संप सुरू होण्यापूर्वी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याची गरज होती.पण शिंदे सरकार कमालीचे निष्क्रिय राहिले.आज सकाळपासून या संपाला सुरुवात झाल्यानंतर कामगार आगाराकडे फिरकलेच नाहीत.त्यामुळे हजारो एसट्या बाहेर पडू शकल्या नाहीत.सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा संप होऊ द्यायला नको होता.पण ते या प्रश्नी उदासीन राहिले,हा संप जर लांबला तर ग्रामीण भागात हाहाकार उडण्याची शक्यता आहे.
हा संप कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना असणारा महागाई भत्याची भरपाई, घरभाडे व वार्षिक वेतनवाढ,४ हजार ८८९ कोटी रु.देय रकमेमधील शिल्लक रकमेचे वाटप करणे,कामगारांच्या मूळ वेतनात ५०००/- रु.ने सरसकट वाढ करावी,इ.मागण्या मान्य करण्यात याव्यात,यासाठी १३ संघटनांनी पुकारला आहे.

