दीपक मोहिते
डहाणू- नाशिककरांचे स्वप्न अखेर साकार होणार,
रेल्वे मंत्रालयाने अखेर डहाणू-नाशिक रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे जाहीर झाल्यानंतर या परिसरातील नागरीक आनंद व्यक्त करत आहेत.या रेल्वेप्रकल्पामुळे या परिसरातील उद्योगधंदे वाढीला चालना मिळणार आहे.गेल्या तीस वर्षांपासून या दोन्ही जिल्ह्यातील नागरिक हा रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यात यावा,अशी मागणी करत होते.मात्र रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प अडगळीत पडला होता.पण आता या प्रकल्पास मंजुरी मिळाल्यामुळे सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाचा ३० वर्षांपूर्वी सर्व्हे करण्यात आला होता.या सर्व्हेवर सुमारे ७० लाख रु.खर्च देखील झाला होता.मात्र त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प व्यवहारी नसल्याचे सांगून तो बासनात गुंडाळला होता.मात्र ,१९९५ साली कै.अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी आल्यानंतर तत्कालीन खा.स्व.चिंतामण वनगा यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यात यावा,यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला होता. १९९९ साली अटलबिहारी वाजपेयी लोकसभा निवडणुकीसाठी जव्हार येथे त्यांच्या प्रचाराला आले असताना वाजपेयी यांनी आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करू,असे जाहीर आश्वासन दिले होते.पण त्यानिवडणुकीत भाजपचा पराभव झाला.पुन्हा काँग्रेस व मित्रपक्षाचे सरकार आले व हा महत्वाकांक्षी प्रकल्प अडगळीत पडला.हा प्रकल्प जर त्यावेळी मार्गी लागला असता तर डहाणू पूर्व,विक्रमगड,जव्हार, मोखाडा,खोडाळा व त्र्यम्बकेश्वर या परिसरात उद्योगधंदे वाढीला चालना मिळून आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकला असता.तसेच त्यावेळी प्रकल्पाचे काम कमी खर्चात झाले असते.पण नोकरशाहीचा हलगर्जीपणा तसेच उदासीनतेमुळे हा महत्वाचा प्रकल्प सुमारे तीस वर्षे धूळ खात पडला.पण आता त्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे डहाणू व नाशिक जिल्ह्यातील नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

