दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
…अन्यथा निवडणुकीत जनता नतद्रष्टाना जोड्याने हाणतील,
मालवण – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेला आता दहा दिवस होऊन गेले,पण उडालेला धुरळा मात्र अद्याप खाली बसू शकला नाही.छत्रपती शिवाजी महाराज,हे मराठी माणसाची केवळ अस्मिताच नाही तर आराध्य दैवत आहे.या घटनेमुळे त्यांच्या मनावर झालेली जखम लवकर भरून येणार नाही,ती भरली तरी त्याचे व्रण मात्र कायम राहणार आहेत.राज्य सरकारने या दुर्घटनेची चौकशी व नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची तयारी,अशा महत्वाच्या कामासाठी दोन समित्यांची नियुक्ती केली आहे.वास्तविक राज्यसरकारच्या गृहविभागाने या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला शोधून काढण्यासाठी सर्वप्रथम पावले उचलायला हवीत.हा शिल्पकार स्वतःहुन फरार झाला आहे कि अज्ञात शक्तीने त्याला फरार होण्यासाठी दबाव टाकला आहे,हे उघड झाले पाहिजे.कारण या जयदीप आपटे याने अत्यंत तकलादू स्वरूपाचा हा पुतळा उभारला होता.सार्व. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुतळ्याची पाहणी केली असता या कामात गंजलेले लोखंडी साहित्य वापरल्याचे त्यांना आढळून आले व त्यांनी तसा अहवालही शासनाला दिला आहे.या अहवालानंतर सरकार या आपटेविरोधात वेगळा गुन्हा दाखल करतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या व्यक्तीला पुतळ्याचे काम कोणाच्या शिफारशीने कंत्राट देण्यात आले,त्याची चौकशीही या समितीने करायला हवी,पण तशी ती होणार नाही.कारण अशा चौकशी समित्या या एकतर लोकांची दिशाभूल करण्यासाठी व वेळ मारून नेण्यासाठी स्थापन करण्यात येत असतात.राज्यात आजवर अशा लाखो चौकशी समित्या नेमण्यात आल्या,पण त्यांचे अहवाल कधीच सार्वजनिक करण्यात आले नाहीत,किंवा या चौकशीत दोषी ठरलेल्या लोकांना सजा झाल्याचे ऐकिवातही नाही.पुतळा उभारण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या कामकाजाचा आढावा मात्र खुला होईल,कारण या समितीचा अहवाल हा फायदेशीर ठरणारा आहे.त्यामुळे या दोन्ही समित्या शासनकर्त्याना फायदेशीरच ठरणाऱ्या आहेत.या समित्याकडून राज्याच्या जनतेला फारशा अपेक्षा नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजन प्रसंगी पुतळा पडल्याबद्दल माफी मागितली आहे.पण त्यांची ही माफी एकप्रकारची नौटंकी असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला दगाफटका होऊ नये,असा गनिमी कावा यामागे आहे.माफी मागताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी आजतागायत वीर सावरकरांची माफी मागितली नाही,असे सांगत आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली.वास्तविक राजकोटवर घाईघाईत उभारण्यात आलेला पुतळा हा राजकीय फायद्यासाठीच होता.लोकसभा निवडणुकीपूर्वी तो अत्यंत घिसाडघाईने उभारला गेला.हा पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे पडला,असा मुख्यमंत्र्यांनी दावा केला होता,त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांची दातखीळच बसली व ते मोदी यांच्या मागोमाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी १०० वेळा डोके ठेवायला तयार असल्याचे सांगत फिरू लागले.१९५७ साली प्रतापगड येथे उभारण्यात
आलेला शिवरायांचा गिरगाव चौपाटीवर असलेला लोकमान्य टिळकांचा व राज्यातील अनेक पुतळे हे गेली अनेक दशके उन्ह,पाऊस व वादळी वारे सहन करत ठामपणे उभे आहेत.त्यामुळे जवळपास ३ हजार कोटी रु.खर्च करण्यात आलेला हा पुतळा पडतो कसा,यामागची कारणे महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवीत,अन्यथा राज्याची शिवप्रेमी जनता आगामी विधानसभा निवडणुकीत या नतद्रष्ट नेत्यांना नक्कीच जोड्याने हाणणार आहेत.

