दीपक मोहिते,
“हल्लाबोल,”
महायुतीमध्ये उलट्याचे प्रमाण वाढत चालले,
महायुती सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांच्या विरोधात गरळ ओकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अंगाची लाही लाही झाली आहे.त्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी ” तानाजी सावंत जे काही बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे,” असा गर्भित इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) महायुतीमध्ये सध्या जमेनासे झाले आहे.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद,या दोन्ही संघटनांनी झालेल्या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडले होते.संघाच्या मुखपत्रातून ( ऑर्गनायझर ) ” भाजपने अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे महायुतीला पराभव पत्करावा लागला,” अशी बोचरी टीका केली होती.त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनी जाहीरपणे अजित पवार गटावर शरसंधान केले आहे.ते आपल्या भाषणात म्हणाले,” मी हाडामासाचा शिवसैनिक आहे,आयुष्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी माझं कधीच जमलं नाही.आज जरी कॅबिनेटमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात,मला ते सहन होत नाही.” या त्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे पित्त खवळले व त्यांच्या उमेश पाटील यांनी ” तानाजी सावंत जे काही बोलले,ते ऐकून घेण्यापेक्षा सरकारमधून बाहेर पडलेले बरे,” अशी प्रतिक्रिया दिली.तर दुसरे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले,” आ.तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत,त्याना उलट्या कशामुळे होतात,हे माहीत नाही.महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे केवळ एकनाथ शिंदेच सांगू शकतील.” या सर्व घडामोडीवरून महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस वाढल्याचे दिसून आले आहे.तानाजी सावंत व उमेश पाटील यांचे हे दोन्ही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेच्या भितीमुळे उलट्या होत असतानाही मारून मुटकून एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत असतात.

