दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महाविकास आघाडीच्या नेत्यांना अवदसा आठवली,
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे अभूतपूर्व यश मिळाले,ते यश त्यांच्या नेत्यांना पचवता येत नसल्याचे आघाडीत चालु झालेल्या कुरबुरीवरून स्पष्ट झाले आहे.आघाडीत सध्या मुख्यमंत्रीपद कोणाला ? यावरून नळावरचे भांडण सुरू झाले आहे.शरद पवार हे एकमेव नेते वगळता इतर घटक पक्षांच्या नेत्यांना आता एकमेकांची ऍलर्जी होऊ लागली आहे.जो तो आम्हीच मोठे,अशा आविर्भावात वावरू लागला आहे.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण/ बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाचेही नाव जाहीर करावे,त्याला माझा पाठींबा राहील,असे जाहीर करून वादाला तोंड फोडले होते.त्यांच्या या वक्तव्याच्या मागे राजकीय चतुरता होती.त्यांच्या या वक्तव्यानंतर घटक पक्षाचे नेते सावध झाले.मात्र शरद पवार यांनी ” आम्हाला या स्पर्धेत बिलकुल स्वारस्य नाही,आम्ही फक्त एकच लक्ष्य ठरवले आहे,ते म्हणजे भाजपला सत्तेतून पायउतार करायला लावायचे.” असे स्पष्ट करत,या वादापासून पक्षाला दूर ठेवले.त्यांनी लोकसभा निवडणूक झाल्यापासून आपली ही भूमिका कायम ठेवली आहे.दुसरीकडे ज्यांना विदर्भाच्या बाहेर काडीची किंमत नाही,असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे डोक्यात हवा गेल्यासारखे वागू लागले.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे अभूतपूर्व यश मिळाले,ते आमच्यामुळेच,असे त्याना वाटू लागले.ते इथेच थांबले नाहीत,तर त्यांना आता मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत.लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मिळालेले यश,हे आपलं कर्तृत्व आहे,असा त्यांनी गोड गैरसमज करून घेतला आहे.मात्र दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्टीना त्यांच्या मर्यादा ठाऊक आहेत.वास्तविक आजच्या घडीला राज्यात काँग्रेसकडे एकहाती प्रचार करू शकेल,असा एकही नेता नाही.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्हा नव्हे तर कराड मतदारसंघापुरते मर्यादित आहेत,त्यांना आगामी विधानसभा निवडणूक जिंकणेदेखील कठीण आहे.बाळासाहेब थोरात हे गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये आहेत.सरळ वागणे व साधी राहणी,कोणत्याही वादात न सापडणे,असे अंगभूत गुण असलेले व्यक्तिमत्व,पण त्यांनाही खूप मर्यादा आहेत.त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना नगर जिल्ह्याच्या बाहेर पक्षवाढीसाठी कधीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत,त्यामुळे त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपवणे,जरा अवघडच आहे.अशा सर्व परिस्थितीत गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण पिंजून काढला होता.ते,खा.संजय राऊत व सुषमा अंधारे यांनी राज्यभरात जाहीर सभा घेऊन सत्ताधाऱ्याना सळो कि पळो,करून सोडले होते.दुसरीकडे शरद पवार,सुप्रिया सुळे,जयंत पाटील व रोहित पवार यांनीही राज्यभरात दौरे काढून सत्ताधारी पक्षाला चांगलेच खिंडीत पकडले होते.
ही वस्तुस्थिती होती,आणि ती कोणीही नाकारू शकणार नाही.या सर्व घडामोडीनंतर उद्धव ठाकरे,खा.संजय राऊत व आदित्य ठाकरे यांना भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत पाचारण केले होते.त्यावेळी झालेल्या बैठकीस सोनिया गांधी व राहुल गांधीही उपस्थित होते.या बैठकीत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्याचे ठरवण्यात आले.या निफण्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे धाबे दणाणले व त्यांनी आता कुरापती सुरू केल्या आहेत.पण शरद पवार जे म्हणतात,त्याप्रमाणे महाविकास आघाडीची वाटचाल होणे गरजेचे आहे.आपापसातील विसंवाद महायुतीच्या पथ्यावर पडू शकतो,हे त्यांनी ओळखले असून घटक पक्षांना सध्या सबुरीने घेण्याचे ते सतत सांगत असतात.या सर्व घडामोडीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीतील विजय पचवता आला नाही.

