दीपक मोहिते,
जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये साईनाथ पारधीच्या पालकांचा सत्कार,
वाडा-मनोरपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या कोहोज,या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी गोऱ्हे या आदिवासी गावातील पै.साईनाथ मोहन पारधी याने ( जॉर्डन ) येथे पार पडलेल्या १७ वर्षांखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल आज स्थायी समिती सभागृहात साईनाथ याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर,बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे,महीला व बाल कल्याण समिती सभापती रोहिणी शेलार,स्थायी समिती सदस्य,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे इ.मान्यवर उपस्थित होते.
साईनाथ हा कामानिमित्त पुणे येथे गेल्यामुळे त्याच्या पालकांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला.
साईनाथने पदार्पणाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक जिंकून जोरदार सुरुवात केली.त्यामुळे आता साईनाथकडून भविष्यातील आशा वाढलेल्या आहेत व उत्तरोत्तर,असेच यश मिळवावे व साईनाथच्या या विजयामुळे आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पालघरचे तसेच महाराष्ट्राचे नाव जगात उंचावले आहे,असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी व्यक्त केले.
साईनाथ हा अत्यंत गरीब कुटुंबामधील असून साईनाथचे आई वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात, साईनाथचे आजोबा आणि वडिलांकडून त्याच्याकडे कुस्तीचा वारसा आला आहे.गोऱ्हे गावात १०० वर्षांपासून रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येत असतो.उत्सवानिमित्त कुस्तीचे सामने खेळले जातात,त्यातूनच साईनाथ कुस्तीमध्ये सहभागी होत असे.वयाच्या ६ व्या वर्षापासून वडील मोहन पारधी यांनी साईनाथला कुस्ती आणि मल्लखांबचे प्रशिक्षण दिले.वडिलांचा अपघात झाला आणि वडिलाचे कुस्ती खेळणे थांबले.परंतु आपण आपल्या मुलाला पैलवान बनवायचे,असे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आणि २०१७ साली गणेश आखाडा भाईंदर यांनी कुस्ती प्रशिक्षणासाठी शिबिर लावले होते,त्या शिबिरासाठी गावातील ग्रामस्थ दिनेश खिलारे आणि सदानंद पाटील यांनी साईनाथला त्या प्रशिक्षणात दाखल केले.या दोघांनीही साईनाथ याला वेळोवेळी आर्थिक सहाय्य केले.या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाल्यावर साईनाथने शालेय स्तरावरून मुंबई,मुलुंड व ठाणे येथील स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले.त्यानंतर साईनाथने राज्य स्तर,राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली.
साईनाथला सरावासाठी मीरा-भाईंदर येथे जावे लागते,अशा प्रतिकूल परिस्थितीतून देखील साईनाथने गाठलेले हे यश खरच कौतुकास्पद आहे, असे सांगून त्याच्या आई वडिलांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.तसेच
सुवर्ण पदकावर देशाचे आणि पालघरचे नाव कोरण्याचे साईनाथचे स्वप्न असून त्यासाठी त्याला शक्य ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिले.
यावेळी सर्व विभाग प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

