दीपक मोहिते,
गणेशोत्सव ; मूर्तिकार अखेरचा हात फिरवण्यात गर्क,
गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवरआला असून गणपतीच्या कारखान्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मूर्ती तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून मूर्तीना रंग देण्याच्या कामात कारागीर सध्या व्यस्त आहेत.त्यासाठी त्यांनी आपले कारखाने तीन पाळ्यात सुरू ठेवले आहेत. सुबक मूर्ती,हिरे,मोती व आकर्षक रंग वापरून मूर्तीला सजवण्यात येत आहे.
कारागिरांची उणीव व ग्रामीण भागात सतत होणारा विजेचा लपंडाव इ.अडचणी कारखानदारांना सतावत असल्यामुळे अनेक कारखान्यांमध्ये दिवसरात्र काम सुरू आहे. गणेशभक्तांनी आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीची आगावू नोंदणी कारखानदारांकडे केली आहे.७ सप्टें.पासून गणेशोत्सव सुरू होत आहे.गेल्या चार महिन्यांपासून कारखान्यांमध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे.जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत गणपतीच्या मूर्ती तयार करून त्या सुकवण्याचे काम कारखानदारांनी मार्गी लावले होते.सद्यस्थितीत कारखान्यांमध्ये मूर्तीना रंग देण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे.मूर्तीना रंग देण्याबरोबरच सुबक नेट-नेटकी आखणी करण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे.तसेच रंगकाम पूर्ण झाल्यानंतर हिरे,मोती,झिंग व आकर्षक रंग वापरून मूर्तीला सुबक बनवण्यात येत आहेत.सणाला दहा दिवस शिल्लक राहिल्यामुळे वेळेत काम पूर्ण करण्याचे आव्हान कारखानदारांसमोर आहे.
यंदा वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्तींच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे.पण गणेशभक्तांच्या मागणीमध्ये मात्र घट झालेली नाही.मूर्ती तयार करण्यासाठी लागणार्या शाडुच्या मातीच्या किंमतीत अगोदरच दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे. रंग साहित्य व अन्य आवश्यक वस्तूंच्या किंमतीही भरमसाठ वाढ झाली आहे.मजुरीच्या दरात वाढ झाली असली तरी सध्या या कामासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे.हे मजूर रायगड जिल्ह्यातून आणावे लागतात.
आपल्या महाराष्ट्रात या सणाला खूप महत्व असून महागाईकडे दुर्लक्ष करून हा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यात येत असतो.मुंबई,ठाणे व पालघर जिल्ह्यात सुमारे १ लाख गणेशमुर्त्या तयार करण्यात येतात,ते ही शाडुच्या मातीच्या.त्यामुुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही,गणपतीचे विसर्जन व्यवस्थित होत असते.
मातीचे व रंगाचे दरवर्षी वाढत असल्यामुळे कारखानदारांना तोटा सहन करावा लागतो.शासनाने शाडु मातीचे दर कमी करावे,जेणेकरून गणेशभक्तांचा भार हलका होईल तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांचा रोजगार टिकून राहील,असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

