दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पराभवाच्या भितीमुळे मुंबई -गोवा मार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी,
कोकणातील लाडक्या बहिणी व त्यांच्या कुटुंबियाचा गणेशोत्सवासाठी होणारा प्रवास सुखद व्हावा,यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या लवाजम्यासह आज पनवेल ते माणगाव दरम्यान असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पळस्पे नाक्यावर दाखल झाले होते.त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीचे दिवस करत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले आणि रस्तेदेखील चकाचक केले.पण हे रस्ते किती दिवस टिकतील,हे मात्र सांगता येणार नाही.
आज करण्यात आलेली ही कार्यवाही केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
हा दौरा करताना एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार व कॅमेरामन यांना पाचारण केले होते.१५००/- रु.वाटुनही लाडक्या बहिणी नाराज आहेत,त्यांचे म्हणणे असे आहे कि आम्हाला पंधराशे रु.नाही दिलेत तरी चालेल,पण कोकणात जाणारा हा रस्ता व्यवस्थित करा.कोकणात गणेशोत्सव सणासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने जात असतात.त्यावेळी लाडक्या बहिणी प्रवासादरम्यान आपल्याला लाखोली वाहतील,अशा भितीतून मुख्यमंत्र्यांचा आजचा हा रस्ते पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता,अशा प्रतिक्रिया माणगाव भागात उमटत होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी गेल्या तीन वर्षात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे सहा पाहणी दौरे पार पडले,पण त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरती डागडुजी केली.मात्र पनवेल-गोवा हा मार्ग वाहतुकीसाठी व्यवस्थित होईल,अशी सुतराम शक्यता नाही.गेल्या १८ वर्षांपासून या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावर आजवर अनेक अपघात होऊन शेकडो नागरिकांचे बळी गेले आहेत.तसेच या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाली,पण एकाही सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नाही.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसेल,अशा भितीतून आता महायुतीच्या नेत्यांनी नौटंकी सुरू केली असल्याचा आरोप महाडव व माणगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

