दीपक मोहिते,
वास्तव,
” खेड्यातला भारत,” कधी पाहायला मिळणार ?
देशवासीयांनी नुकताच ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.हा दिवस आपल्यासाठी एक उत्सवच असतो.आपल्या पूर्वजांनी इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व झोकून दिले,लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,त्यांच्या या बलिदानानंतर तुमच्या आमच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवली.गेल्या ७८ वर्षात देशाने विविध क्षेत्रात प्रचंड भरारी घेतली.आज महासत्तांसोबत आपण स्पर्धेत उतरले आहोत.सहा महिन्यांपूर्वी आपण चंद्रावर स्वारी करू शकलो,ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.पण आजही आपल्या देशात गरीबी,बेरोजगारी व ग्रामीण व्यवस्थेला बळकटी देणे,या प्रश्नी मागासलेलेच आहोत.स्वातंत्र्योत्तर काळात विकासाचा प्रवाह केवळ शहरी भागातूनच वाहत राहीला.त्यामुळे ग्रामीण भाग कात टाकू शकला नाही.
सात वर्षांपूर्वी मोखाडा तालुक्याच्या सावर्डे गावात एका आजारी व्यक्तीला चादराची झोळी करून काही तरुण रुग्णालयात नेत असल्याची बातमी मी छायाचित्रांसह प्रसिद्ध केली होती.या तालुक्यातील अनेक पाड्यावर रस्ते नसल्यामुळे आजारी व्यक्ती व गरोदर महिलांना उपचारासाठी अशाप्रकारे न्यावे लागते.आजही तशीच परिस्थिती अधून मधून पाहायला मिळते.काँग्रेस पक्षाने ” आपला भारत महान,” ठरवला होता.सध्याचे रालोआ सरकार म्हणते,” सबका साथ,सबका विकास,” आपण चंद्रावर स्वारी करू शकतो,शहरी भागात मेट्रोचे जाळे निर्माण करू शकतो,अब्जावधी रु.खर्च करून महामार्ग बांधू शकतो,कोटी कोटींची उड्डाणपूले उभारू शकतो.पण ग्रामीण भागात पाड्यापाड्यावर असलेल्या पायवाटांचे रस्त्यात रूपांतर करू शकत नाही.
महात्मा गांधीने पाहिलेला ” खेड्यातील आपला भारत,” आपल्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नातच राहिला.एकीकडे हे भयानक वास्तव,दुसरीकडे जातीयवादी शक्तिचा हैदोस……. हाच का
” सबका साथ,सबका विकास,” ?
कॉंग्रेसच्या नाकर्तेपणामुळे त्याना २०१४ साली सत्तेतून पायउतार व्हावे लागले.विकासाकडे दुर्लक्ष,आर्थिक गैरव्यवहार,महागाई,
सरकारी योजनांच्या अमलबजावणीमधील बजबजपुरी इ.कारणे कॉंग्रेसच्या पराभवाला ठरली होती.त्यावेळी देशवासियानी नियोजनबद्ध विकास,आर्थिक गैरव्यवहार रोखणे,महागाईवर नियंत्रण व सरकारी योजनांचा थेट नागरीकाना लाभ व रोजगार निर्मीती इ.अपेक्षा बाळगुन भाजपला पर्याय म्हणून स्विकारले.परंतु लोकांचा भ्रमनिरास झाला.दोन दशकापूर्वी
मध्य पूर्व आशियातील मुस्लिम देशाच्या राजकारणात धर्माचा प्रवेश झाला,व आज ते देश पार रसातळाला गेले आहेत.त्या सर्व देशात अराजक निर्माण झाले आहे.तो अनुभव लक्षात घेऊन आपली वाटचाल होणे गरजेचे आहे.आज इस्त्रायल हा देश विकासाच्या बाबतीत जगासाठी रोलमॉडेल ठरला आहे.स्वयंसिद्धता कशाला म्हणतात,हे या देशाने जगाला दाखवून दिले आहे.

