दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा बरळले,
आपण एका संविधानिक पदावर बसलो आहोत,याचा कायम विसर पडणाऱ्या अजित पवार यांनी एका जाहीर सभेत ” बलात्कार करणाऱ्या विकृत माणसांचे गुप्तांग कापून टाकायला पाहिजे,” अशी बेताल बडबड केली.त्यांच्या या बडबडीकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही.पण एका गोष्टीचे महाराष्ट्राला आश्चर्य वाटले,ते म्हणजे बदलापूर येथे जी घटना घडली ती १३ ऑगस्ट रोजी,आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांना तब्बल १० दिवसांनी उपरती व्हावी,व त्यांनी नको त्या गोष्टी कापून काढायची भाषा करावी.
या घटनेचा उशीरा का होईना त्यांना इतका पुळका यावा,हेही नसे थोडके,असेच म्हणावे लागेल.तुम्हाला जे करावेसे वाटते,ते तुम्हीच करू शकता,कारण इतरांना ते शक्य नाही.बदलापूर येथे आंदोलन करणाऱ्या जमावाने ” आरोपीला ताबडतोब फाशी द्या,” अशी मागणी लावून धरली होती,त्यांच्यावर तुम्ही लाठ्यांचा वर्षाव केला होता आणि आता तुम्ही तशीच मागणी करता तेही उपमुख्यमंत्री पदावर बसले असताना.त्यावेळी संतापाच्या उद्रेकातून जमावाचा तो आक्रोश होता,त्याला आपण ” पब्लिक क्राय,” असे म्हणतो.अशा पब्लिक क्राय वर निर्णय होत नसतात.हे अजित पवार,तुम्हाला माहित असायला हवं.जर तुम्हाला हा मार्ग योग्य वाटत असेल तर तुमच्या पोलिसांना द्या आदेश आणि करून पहा.उगाच ” उचलली जीभ लावली टाळूला,” अस करू नका.समोर गर्दी दिसली की काहीतरी बरळत सुटायचं आणि टाळ्या मिळवायच्या हे उपदव्याप आता बंद करा,बोलताना तारतम्य बाळगा.भारतीय संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत राहून वागा.या अशी बेताल बडबड करून मते मिळत नसतात.वेळीच लक्षात घ्या,अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कृष्णेच्या त्रिवेणी संगमावर आत्मक्लेश उपोषण करत बसावे लागेल.

