दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कंगनाने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये,
येत्या ६ सप्टें.रोजी माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीवर आधारीत ” इमर्जन्सी,” हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.त्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.या सिनेमात कंगना राणावत ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही तीने पार पाडली आहे.
मात्र हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी कंगना राणावत हीने आपल्या अकलेचे बरेच तारे तोडले आहेत.इंदिरा गांधी यांना तीने किती वाचलं आहे,देव जाणे,पण इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यापूर्वी त्यांनी इतिहासात डोकावून पाहायला हवे होते.कारण इंदिरा गांधी यांच्याविषयी बोलताना तीने जी बेताल वक्तव्ये केली आहेत,तशी ती केली नसती.” इंदिरा गांधी यांच्यामध्ये परिपक्वतेचा अभाव होता व त्या घरणेशाहीतुन आल्या होत्या,” असे असंबद्धपणे बोलली नसती.१९७० च्या दशकात इंदिरा गांधी या दक्षिण आशियामध्ये सर्वात बलाढ्य नेत्या होत्या.त्यांचे धाडस,निर्णय घेण्याची असामान्य क्षमता व लढाऊ वृत्ती,या गुणांनी त्यांनी पाश्चात्य देशांच्या नेत्यांना चांगलेच जेरीस आणले होते.१९७१ च्या पाक-भारत युद्धात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन व त्यांचे सल्लागार हेनरी किसिंजर यांनी पाकच्या मदतीसाठी आपले महाकाय सातवे आरमार ( एंटरप्रायझेस ) आपल्या सागरी क्षेत्रात पाठवले होते.या घटनेची खबर लागताच इंदिरा गांधी यांनी रातोरात मॉस्को गाठले व रशियाचे तत्कालीन पंतप्रधान कोसीजीन यांची भेट घेतली.त्यानंतर रशियाच्या अण्वस्त्रधारी पाणबुड्या भारताच्या दिशेने सुसाट वेगाने निघाल्या.रशियाहून पाणबुडी निघाल्याची माहिती मिळताच अमेरिकेने आपले सातवे आरमार माघारी बोलावले.याला मुत्सद्देगिरी म्हणतात,आणि ही कंगना म्हणते,त्यांच्याकडे परिपक्वता नव्हती.या युद्धात इंदिरा गांधी यांनी जे धाडसी निर्णय घेतले,त्याचे जगभरात कौतुक झाले.त्यांच्या समयसुचकतेमुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले.त्यानंतर त्यांनी जी देशावर आणीबाणी लादली ती चुकीचीच होती,त्याचे कदापी समर्थन होऊ शकत नाही.त्यांच्या या निर्णयाचे परिणाम देखील त्यांना भोगावे लागले.त्या घराणेशाहीतून आल्या असल्या तरी त्यांची राजकीय वाटचाल ही त्यांच्या स्वकर्तृत्वावर झाली,हे त्यांच्या विरोधकांनाही अमान्य करता येणार नाही.त्यामुळे या कंगनाबाईंना सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नकोस,तेवढी तुझी उंची देखील नाही,असे कोणीतरी सांगायला हवे.

