पालघर,
पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी ; शेतकरी आनंदात,
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातून गायब झालेला मान्सून काल रात्रीपासून पुन्हा सक्रिय झाला आहे.काल रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.तसेच सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे.
सुमारे दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने काल रात्री पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्हावासीयांना सुखद धक्का बसला आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडले होते.पावसाअभावी शेतीची शिल्लक कामे अनेक दिवसांपासून रखडली होती.तर दुसरीकडे शेतमजुरांना बसून पगार द्यावा लागत होता.त्यामुळे यंदा भातशेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो कि काय ? अशा मनःस्थितीत शेतकरी सापडले होते.शेतमजुरांना बसून पगार दिला नसता तर ते आपल्या मूळ गावी निघून गेले असते,त्यामुळे शेतकऱ्यांनी पदरमोड करत त्यांचे पगार भागवले.कालच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला आहे.भातशेती सध्या अंतिम टप्प्यात असून शेताची शिवारे आता कापणीच्या प्रतिक्षेत आहेत,लवकरच या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
यंदा भातशेतीला आवश्यक असलेला पाऊस झाल्यामुळे भात वरई व नागलीचे पीक मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांच्या हाती लागेल,असा अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला आहे.पावसाने पुन्हा हजेरी लावली नसती तर तयार झालेली भाताची रोपे उन्हाच्या कडाक्यात आडवी झाली असती तसेच रोगराईचा प्रादुर्भाव झाला असता,पण या पावसामुळे आम्ही फार मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

