अजय काळभोर,वसई,
वसई पाचूबंदर क्षेपणभूमी ( डम्पिंग ) ; त्वरित बंद करा- वसईकरांचा आक्रोश,
वसई-पाचूबंदर येथे असलेल्या बेकायदा क्षेपणभूमीमुळे येथील मत्स्यव्यवसाय व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.ही क्षेपणभूमी त्वरित बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
याविषयी नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वसई भाजपचे नेते मनोज पाटील यांनी आरोग्य निरीक्षक व स्थानिक नागरिकांच्या सोबत सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.या पाहणीत येथे बेकायदा क्षेपणभूमी ( डम्पिंग) निर्माण केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षेपणभूमीवर मोठ्या प्रमाणात कचरा आणण्यात येत असल्याचेही त्यांना दिसून आले.त्यामुळे मनोज पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत वसई-विरार महापालिकेच्या गाड्यांना या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध केला. शिवाय पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना जाब विचारत ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.तसेच येथे बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेला कचरा त्वरित हटवण्याची मागणी केली.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील दैनंदिन कचरा संकलन व नालेसफाई करण्यासाठी पालिकेने प्रभागनिहाय २० ठेकेदारांची नियुक्ती केलेली आहे.त्यासाठी महापालिका महिन्याकाठी १४ कोटी रु.खर्च करते.तर वार्षिक २०० कोटीहून अधिक रु. याकामी खर्च होत आहेत.शहरात गोळा होणारा कचरा ठेकेदारांनी गोखिवरे येथील क्षेपणभूमीवर जमा करणे अपेक्षित आहे.परंतु तसे न करता हा कचरा मातीभराव म्हणून किंवा आडोशाच्या मोकळ्या जागेत रिकामा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
वसई-पाचूबंदर येथील अशाच एका बंद केलेल्या जागेत बेकायदा क्षेपणभूमी निर्माण करून त्या ठिकाणी कचरा संकलन केले जात आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबतच्या तक्रारी वसई भाजप निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या.त्याअनुषंगाने त्यांनी सहकारी आणि स्थानिक रहिवाशांसह आज या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली व या समस्येचा आढावा घेतला.त्यावेळी अनेक गाड्या या जागेवर कचरा आणत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तो कचरा टाकण्यास प्रतिबंध केला. वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना जाब विचारून ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
संपूर्ण परिसराच्या पाहणीत अनेक दिवसांपासून या ठिकाणी संकलित केलेला कचरा पावसाच्या पाण्यासोबत शेजारी असलेल्या खाडीत वाहून गेल्याचेही निदर्शनास आले.या कचऱ्यामुळे पाणी दूषित झाले असून खाडीत दलदल निर्माण झाली आहे. पाचूबंदर आणि परिसर कोळंबी,पापलेट आणि चिंबोरी,अशा वैविध्यपूर्ण मासळीसाठी ओळखला जातो.या मत्स्यव्यवसायावर हजारो कोळी बांधव व विक्रेत्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.परंतु या ठिकाणी सातत्याने कचरा टाकला जात असल्यामुळे सागरी जीव धोक्यात आले आहेत.याचा परिणाम मत्स्य व्यवसायावर होत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी मनोज पाटील यांना दिली. किंबहुना यात जैविक कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने त्या ठिकाणी भटकी कुत्री,डुकरे यांचे संक्रमण वाढले आहे.त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावरही होत आहे. दरम्यान या प्रकरणी वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन या समस्येवर चर्चा करणार असल्याचे वसई भाजपचे नेते मनोज पाटील यांनी स्थानिक रहिवाशांना आश्वस्त केले आहे.यावेळी स्थानिक नागरिक तसेच भाजपा पदाधिकारी नंदकुमार महाजन,किरण पाटील,विनम्र घरत,राजल नाईक व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

