दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळीच शहाणे व्हावे,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी खोटे बोलण्याची जणू स्पर्धाच सुरू केल्याचे पाहायला मिळतंय.बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर महायुतीचे हे दोन नेते पार बावचळून गेले आहेत.आपण काय बोलतो आहोत,याचे जराही भान न ठेवत ते धडधडीत खोटं बोलू लागले आहेत.विरोधकांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हचा आधार घेत मतदारांची दिशाभूल केली,त्यामुळे आमचा पराभव झाल्याचे ते निकालानंतर ओरडून सांगत होते.वास्तविक २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी याच फेक नरेटिव्हचा बेमालूम वापर करत सत्ता मिळवली होती.ते हत्यार आता बुमरँगसारखे त्यांच्यावर उलटले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसल्यानंतर त्यांच्या वागण्यात सुधारणा होईल,अशी अपेक्षा होती.पण सत्तेच्या धुंदीत ते स्वतःला बदलू शकले नाहीत.दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका जाहीर सभेत खोटं बोलण्याची परिसीमा गाठली.ते आपल्या भाषणात म्हणाले,दोन वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या बलात्कार घटनेचा खटला आम्ही फास्टट्रॅक वर चालवला व आरोपीला तातडीने फाशी दिली.हे ऐकताच उभ्या महाराष्ट्राने कपाळावर हात मारून घेतला.कोणत्या आरोपीवर फास्टट्रॅकवर खटला चालवण्यात आला व त्या आरोपीला कोणत्या जेलमध्ये तातडीने फाशी देण्यात आली ? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला पाहिजे.ते सांगत असलेली फाशी तब्बल २ वर्षाने देण्यात आली होती.शिंदे हे धडधडीत खोटे बोलले,त्यांचे असं वागणे चुकीचे आहे,कारण त्यांनी संविधानिक पदावर असताना हे विधान केले आहे.अशी फाशी देताना राज्यपालाच्या कार्यालयात नोंद होऊन त्यांची अनुमती घ्यावी लागते.मुख्यमंत्री जो दावा करत आहे,ती फाशी दोन वर्षानंतर देण्यात आली होती.ताबडतोब आम्ही आरोपीला फाशी दिली,हे निखालस खोटे आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आता फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यांचे जे केंद्रीय नेते दहा वर्षांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ” पप्पू,” म्हणून हिणवत होते,त्यांच्या विरोधात फेक नरेटिव्ह पसरवत होते,आज त्याच ” पप्पू,” ने त्यांच्या नेत्यांची ५६ इंची छाती आता ३६ इंचावर आणून ठेवली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व घडामोडीकडे दुर्लक्ष करता कामा नये.

