दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
२४ ऑगस्ट रोजी ” महाराष्ट्र बंद,”
बदलापूर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी विरोधी पक्षाने आता महायुतीच्या सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.येत्या शनि.२४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने ” महाराष्ट्र बंद,” ची हाक दिली आहे.शाळेची संस्था भाजपशी संबधित असल्यामुळे पोलिसांनी दबावाखाली येऊन कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून महायुती सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावल्याचे माध्यमासमोर आज स्पष्ट केले.
बदलापूर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी संस्थाचालक व पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचे बदलापूरकरांचे म्हणणे आहे.त्यामुळे काल लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले.या घटनेमुळे सरकार आता अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या काही महिन्यात पुणे,मुंबई व अन्य शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढल्याच्या कारणावरून राज्याच्या गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तसेच हे खाते सांभाळण्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट ) खा.सुप्रिया सुळे व शिवसेनेच्या ( उबाठा गट ) सुषमा अंधारे या दोघींनी केला आहे.या सर्व घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी या आंदोलनाला राजकीय प्रेरणा होती.आंदोलन करण्यासाठी बाहेरून ट्रकभरून माणसे आणण्यात आली,असा बेछूट आरोप केल्यामुळे या संवेदनशील प्रश्नाला आता राजकीय वळण मिळाले आहे.विरोधकांनी सरकारला या प्रश्नी जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.त्यासाठी येत्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने ” महाराष्ट्र बंद,” ची हाक दिली आहे.या बंद मध्ये राज्यातील अनेक संघटना सहभागी होणार आहेत.

