सुधाकर नेवरेकर,
हाल – बेहाल,
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई,
मराठवाडा महसूल विभागात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गावात पावसाळा सुरू असतानाही तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.जालना जिल्ह्यात सुमारे ४० गावात ७७ टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून याभागातील नागरिकांना पाण्याअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग असून अनेक जिल्हे दरवर्षी पाणीटंचाईमध्ये होरपळत असतात.त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील अनेक तालुक्याना टँकरचा आधार घ्यावा लागतो.जालना तालुक्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या ऑक्टो.पासून सुरू झालेले पाण्याचे टँकर ऑगस्ट २०२४ संपत आला तरी सुरूच आहेत.या तालुक्यात असलेले जुई धरण अद्याप कोरडेठाक पडल्यामुळे एकूण ३२ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.विदर्भाच्या काही तालुक्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.यंदा विदर्भ व मराठवाडा विभागात केवळ ७१ % पाऊस झाला आहे.अशा परिस्थितीमध्ये यंदा जर पावसाचे प्रमाण अल्प राहिल्यास पुढील वर्षी मार्च ते जून,या चार महिन्यात हाहाकार उडेल,अशी भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.या जिल्ह्यात बोअरिंगलाही पाणी लागत नसल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून स्थानिक प्रशासनाने टँकरवर भर दिला आहे.

