दीपक मोहिते,
वास्तव,
पाण्याच्या शोधात बिबट्यांचा शहरी भागात मुक्तवावर,
गेल्या काही वर्षात बिबट्याचा मनुष्यवस्तीमध्ये मुक्त वावर सुरू झाला आहे.मध्यंतरी भाईंदर,चेना ब्रिज व आता वाडा तालुक्यात काही बिबट्यांचा वावर पाहायला मिळाला.
एरवी बिबट्यांचे दर्शन दुर्लभ असताना हे बिबटे डोंगर कपारी व जंगलातून खाली का उतरू लागले आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पर्यावरण,प्रदूषण व मानवाचा हव्यासपणा,अशी तीन कारणे या ज्वलंत प्रश्नाच्या मागे असल्याचे दिसून आले आहे.जंगलपट्टी मध्ये वाढत असलेल्या झोपडपट्ट्या,जंगलातील वृक्षांची बेसुमार कत्तल व डोंगर पोखरून होणारी माती चोरी आदी कारणांमुळे हिंस्त्र श्वापदे आता जंगलाबाहेर पडू लागली आहेत.जंगलातील पाण्याचे साठे आटले असून ही श्वापदे पाण्याच्या शोधात शहरात फिरू लागली आहेत.जंगलात मानवाचा होत असलेला गोंगाट व पाण्याचे दुर्भिक्ष,यामुळे भविष्यात केवळ बिबटेच नाहीतर अन्य श्वापदेही रस्त्यावर हिंडताना दिसले तर आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये.जंगल व गिरीवनाचे संरक्षण व्हावे,यासाठी सरकारने पाच दशकापूर्वी वनविभागाची स्थापना केली.या विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमून देण्यात आलेल्या कामाऐवजी जमिनीच्या सातबारा उताऱ्यामध्ये अधिक रस आहे.आज जंगलात जी बेसुमार वृक्ष कत्तल होत आहे,ती या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने होत आहे.लाकूडमाफिया वृक्षकत्तल करताना वृक्ष उन्मळून पडतील,अशा पद्धतीने कत्तल करत असतात.झाडांची मुळे भूगर्भातील पाणी घट्ट पकडून ठेवत असतात.त्यामुळेम पावसाळ्यात भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होत असते.पण हल्ली ही प्रक्रिया पार थंडावल्यामुळे जंगलातील पाण्याचे साठे आटत चालले आहेत.त्यामुळे जनावरे पाण्याच्या शोधात आता सर्वत्र हिंडू लागली आहेत.

