दीपक मोहिते,
आंतरराष्ट्रीय घडामोडी,भाग क्र.४
फ्रंटलाईन,
त्यामुळे मालदीव ताळ्यावर आला…
मालदीव हा देश जमिनी क्षेत्रानुसार सर्वात लहान असा देश असून तो
मुस्लिमबहुल आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या जनगणनेमध्ये या देशाची लोकसंख्या पाच लाख पंधरा हजार इतकी असल्याचे स्पष्ट झाले.तो भारताच्या नैऋत्येस ६०० कि.मी.अंतरावर लक्षद्वीप समूहाजवळ २६ बेटांवर वसलेला आहे.माले ही त्याची राजधानी आहे.देशाचे वार्षिक सकल उत्पन्न हे २.८४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे.हा देश अनेक वर्षे ब्रिटनच्या ताब्यात होता.२६ जुलै १९६५ मध्ये तो स्वतंत्र झाला.या देशाशी भारताचे अत्यंत चांगले व सौहार्दाचे संबंध आहेत.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यामध्ये कटुता निर्माण झाली आहे.गेल्या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रपती मोहंमद मुइज्जू यांनी भारताने आपल्या देशातील सैन्याला माघारी बोलवावे,अशी मागणी केली होती.निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी भारतीय सैन्य मालदीवमध्ये यापुढे राहणार नाही,असे जाहीर आश्वासन दिले होते.त्यानंतर १७ नोव्हें.रोजी सत्तेत आल्या आल्या त्यांनी १५ मार्चपर्यंत भारताने मालदीवमधून आपले सैन्य काढून घ्यावे,अशी मागणी केली.मालदीवमध्ये सध्या ८८ भारतीय सैनिक आहेत.मालदीव सरकारचे सार्वजनिक धोरणाचे मुख्य सचिव अब्दुल्ला नझीम इब्राहिम यांनी भारतीय सैनिकांनी मालदीवमध्ये राहू नये,अशी देशातील लोकांचीही इच्छा असल्याचे भारताला कळवले.त्यानंतर भारताने देखील आपले सैन्य माघारी बोलवण्यास तयार असल्याचे त्यांना कळवले,पण ते कधीपर्यंत काढून घेऊ,याविषयी काहीच सांगितले नव्हते.या सर्व घडामोडीमागे चीन आहे,हे भारताच्या केंव्हाच लक्षात आले होते.मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू हे चीनचे कट्टर समर्थक असल्याचे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्पष्ट झाले होते.त्यामुळे त्यांनी सत्तेत आल्यापासून भारताला विरोध करण्यास सुरुवात केली.त्यांच्या मंत्री मरियम शीउना व अन्य दोन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानस्पद वक्तव्य केले,त्याचे भारतात तीव्र पडसाद उमटले.मंत्र्यांच्या या वक्तव्याचा परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल,अशा भितीमुळे मालदीव सरकारने या तीनही मंत्र्यांना तातडीने बडतर्फ केले.
चीन,हिंदीमहासागरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी गेल्या काही वर्धपासून प्रयत्नशील आहे,पण त्यांना फारसे यश मिळत नव्हते.सत्तेच्या केंद्रस्थानी आपल्या समर्थकाची वर्णी लागल्यामुळे चीनच्या हालचालीना वेग आला.पण हिंदी महासागर क्षेत्रात चीनने पाय रोवणे, अमेरिकेला परवडणारे नव्हते.मात्र अमेरिका त्यावेळी बघ्याच्या भूमिकेत होती.दरम्यान भारताने एकीकडे मालदीव सरकारशी द्विपक्षीय बोलणी सुरू केली,तर दुसरीकडे भारतीय पर्यटकांनी मालदीव येथे पर्यटनासाठी जाऊ नये,मालदीवला जाण्याऐवजी भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीपला जावे,असे आवाहन करण्यास सुरुवात केली.त्यामुळे मालदीव सरकारची घाबरगुंडी उडाली.त्यांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे.दरवर्षी भारतातून लाखो पर्यटक मालदीवला भेट देत असतात.पर्यटनाच्या माध्यमातून या देशाला प्रचंड महसूल मिळत असतो.मोदी सरकारने खेळलेल्या या खेळीमुळे मालदीव सरकारने अखेर नांगी टाकली व तो चर्चेसाठी टेबलावर आला.दरम्यान अमेरिकन व फ्रांस सरकारनेही मालदीव सरकारचे कान चांगलेच उपटले.भारतातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ ओसरला तर आपली अर्थव्यवस्था डबघाईला येईल,हे ओळखून मालदीव आता ताळ्यावर आला आहे.
क्रमशः

