दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
जे पोटात होते,ते ओठावर आले,
रक्षाबंधनाच्या तोंडावर भाजपचे आ.रवी राणा व शिवसेनेचे ( शिंदे गट ) आ.महेश शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या ” लाडक्या बहिणीं,” ना थेट धमक्या दिल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची सारवासारव करताना झालेली दमछाक उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर काल जळगाव येथे जाहीर सभेत बेंबीच्या देठापासून कोकलत होते.या दोघा आमदारांनी गमतीने हे वक्तव्य केले असल्याचे ते ” खोटं बोल,पण रेटून बोल,” या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बोलत होते.
आ.राणा काय म्हणाले पाहूया,” जर तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलात तर या १५०० रु.चे ३००० रु.होतील.पण जर का तुम्ही आशीर्वाद दिले नाहीत तर मी तुमचा भाऊ आहे,हे लक्षात ठेवा,१५०० रु.परत घेईन.” तर आ.महेश शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्यास लाडकी बहीण योजनेतून तुमचे नाव डिलीट करीन,” अशी थेट धमकी देऊन मोकळे झाले.
त्यांच्या या धमक्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले.खा.सुप्रिया सुळे यांनी आक्रमक होत,” तू १५०० रु.परत घेऊनच दाखव,तुझा करेक्ट कार्यक्रम करते की नाही ते तू बघच,” असे जाहीर आव्हान दिले.तर काँग्रेसचे व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ” हा तुझ्या बापाचा पैसा आहे का ? ” असा प्रश्न विचारला.या सर्व घडामोडीनंतर महायुतीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.” नेमेची येतो पावसाळा,” या म्हणीनुसार देवेंद्र फडणवीस सारवासारव करण्यासाठी उभे सरसावले.पण त्यांनी केलेल्या खुलाश्यात नौटंकीपणा अधिक होता.विरोधकांवर टीका करताना त्यांनी विरोधकांना सावत्र भावाची उपमा दिली तर या आमदारांनी गमतीने ते वक्तव्य केल्याचे ते घसा ओरडून सांगत होते. फडणवीस यांना माहीत आहे की या दोघांचे वक्तव्य आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला डोकेदुखी ठरू शकते.त्यामुळे त्यांनी काल जळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले.त्यानंतर खा.सुप्रिया सुळे यांनी ” जे पोटात होते,ते ओठावर आले,” अशी प्रतिक्रिया देत गेल्या लोकसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीला बारामतीच्या मातीत गाडण्यासाठी आपल्या भावांनी किती व कसे हातखंडे वापरले,हे एका वाक्यात दाखवून दिले.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ” लाडक्या बहिणी,” आपल्या या तथाकथित सावत्र भावांना धोबीपछाड देतील,अशी शक्यता आहे.

