दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आरक्षणप्रश्नी महायुतीच्या नेत्यांची अवस्था,” इकडे आड,तिकडे विहीर,”
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मराठा व ओबीसी आरक्षणप्रश्नी अडचणीत आणण्यासाठी महायुतीचे राज्यातील नेते सध्या निरनिराळे हातखंडे वापरत आहेत.मात्र त्यामध्ये त्याना शरद पवार काही यश मिळू देत नाहीत.काल शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवा व या बैठकीला मराठा नेता मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही बोलवण्यात यावे,अशी थेट गुगलीच टाकल्यामुळे एकनाथ शिंदे यांना याविषयी प्रतिक्रिया द्यावी लागली तर छगन भुजबळ यांनीही सावध पवित्रा घेत,यातून काय निष्पन्न होणार ? असा उलट प्रश्न विचारला.
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या काही संघटना,( मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबधित नसलेल्या ) शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी निदर्शने करणे,तसेच त्यांची वाहने अडवून आरक्षण विषयी तुमची भूमिका काय आहे ? अशी विचारणा करत आहेत.या सर्व संघटनांना मराठा समाजात फारसे कोणी विचारत नाहीत.पण महायुतीच्या काही नेत्यानी त्यांना हाताशी धरून हे सारे उपदव्याप सुरू केले आहेत.महायुतीच्या या अशा कटकारस्थानाला काल पवारांनी चांगलाच काटशह दिला.त्यांनी ” या प्रश्नी राज्यसरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी व या बैठकीला मराठा नेते मनोज जरांगे पाटील,ओबीसी नेते छगन भुजबळ व अन्य नेत्यांना बोलवण्यात यावे,असे आवाहन करत आरक्षणाचा चेंडू त्यांनी महायुतीच्या कक्षात ढकलला.पण ते यावरच थांबले नाहीत.तर त्यांनी आरक्षणाची ५० % ची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे व त्यासाठी केंद्र सरकारने आपले धोरण बदलले पाहिजे,सरकारने तशी भूमिका घेतल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे मोठे विधान केले.त्यामुळे महायुतीचे नेते पार हडबडून गेले.ते पुढे म्हणाले,महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे,दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही,यासाठी केंद्र सरकारने पावले टाकायला हवीत,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शरद पवार यांच्या या खेळीने महायुतीच्या नेत्यांची अवस्था सध्या ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी झाली आहे.

