पालघर,
मुंबई-अहमदाबाद महामार्ग बांधणीच्या कामात प्रचंड हेळसांडपणा,
६०० कोटीचा चुराडा,नागरिक बेहाल,
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग १२ लेनचा करणे,तसेच दहिसर ते तलासरी या ११० किमी. अंतराच्या मार्गाचे काँक्रीटीकरण करणे,या कामासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी नोव्हे.महिन्यात ६०० कोटी रु.निधी दिला.
त्यानंतर संबधित ठेकेदाराने काम देखील सुरू केले.पण या कामात कोणतेही नियोजन नव्हते,तसेच बांधकामात वापरण्यात आलेल्या नित्कृष्ट दर्जाचे साहित्य,यामुळे या महामार्गाची सध्या पार दुर्दशा झाली आहे.या कामाकडे प्राधिकरणाचे अधिकारी फिरकत नसल्यामुळे ठेकेदार आपली मनमानी करत आहे.महामार्गाचे काम सुरू होऊन आठ महिन्याचा कालावधी लोटला पण केवळ ३५ ते ४० % च काम झाले आहे.या झालेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर सहसा खड्डे पडत नाहीत,पण हा महामार्ग त्यास अपवाद ठरला आहे.त्यामुळे तलासरी – दहिसर हे ११० कि.मी.अंतर पार करायला किमान सात ते आठ लागतात.या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी पालघरवासीयांनी केली आहे.तसेच वसई तालुक्यातील अंतर्गत रस्तेही जैसे थे स्थितीतच आहेत.चंदनसार ते विरार फाटा दरम्यान असलेला राज्यमार्ग याची इतकी दुर्दशा झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही.केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून संबधित ठेकेदारांची कानउघाडणी केली पाहिजे,असे नागरिकांचे म्हणणे आहे.याप्रकरणी पालघरचे खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या गंभीर समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले होते.पण त्यानंतरही कोणतीही हालचाल न झाल्यामुळे पालघरावासियांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

