दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
विरोधकांना १५००/- रु.चे मोल कळत नाही- अजित पवार,
काल कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ” माझी लाडकी बहीण,” योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना १५०० रु.चे मोल काय कळणार ? अशी टीका केली होती.पवार यांची ही टीका योग्यच आहे,कारण विरोधकाना ७० हजार कोटी व १५ लाख रु.चे मोल कधीच कळले नाही.त्यांना १५००/- रु.चे मोल कसे कळणार ? त्यामुळे अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न योग्यच होता,असेच म्हणावे लागेल.
आपल्या बहिणीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विविध हातखंडे वापरणाऱ्या या आधुनिक काळातील भावाला बारामतीच्या लाखो बहिणींनी नुकताच घरचा आहेर दिला होता.आपल्या मुलाला व पत्नीला निवडून आणू न शकणारा भाऊ आता लाखो बहिणीच्या आयुष्यात उष:काल निर्माण करण्याचे सांगत फिरू लागला आहे.समोर गर्दी दिसली की वाहवत जाणाऱ्या या नेत्याला आपण काय बोलतो व त्याचे कसे परिणाम होतील ? याचे भान राहत नाही.त्यामुळे त्यांना झालेल्या चुकीबद्दल एकतर माफी मागावी लागते किंवा कृष्णेकाठी बसून आत्मक्लेश उपोषण करावे लागते.
अशा या अहंकारी नेत्याला आगामी विधानसभा निवडणुकीत बहिणी आपल्या शेतकरी पतींना या महाशयाने दिलेल्या उर्मट उत्तराची परतफेड करण्याचा तयारीला लागल्या आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत या बहिणींनी थोडीफार परतफेड केली आहे,आता विधानसभा निवडणुकीत त्या फिट्टफाट करण्याच्या तयारीत आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्यास त्यांच्या पक्षात पळापळ सुरू होईल.कारण एखादे जहाज बुडायला लागले की सर्वप्रथम उंदराची पळापळ सुरू होते.आपले या पक्षात काही खरं दिसत नाही,हे लक्षात आल्यानंतर अनेक जण आता परतीच्या मार्गाला लागले आहेत.तसेच ज्या पक्षाचे पालकत्व त्यांनी स्विकारले आहे,त्या पक्षाच्या मातृत्व शाखेनेही ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ) यांची ” संगत नको रे बाबा,” अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे बहिणींना १५००/- ची खिरापत वाटणे,त्यांना लाभदायक ठरेल,असे वाटत नाही.

