दिपक मोहिते,
बॉटमलाईन,
महाराष्ट्राची वाटचाल अराजकाच्या दिशेने,कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर,
राज्यात सध्या जे काही चाललंय ते पाहता आपले राज्य,आता अराजकतेच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचे जाणवू लागले आहे.मराठा/ओबीसी आरक्षण व जीवघेणी सत्तास्पर्धा,अशा दोन कारणामुळे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होत आहे.गेल्या पाच वर्षात उद्योग व व्यापार या दोन क्षेत्राचा ग्राफ चांगलाच खाली आला आहे.सरकार अब्जावधी रु.ची परकीय गुंतवणूक होत असल्याचा दावा करत असली तरी त्यात बिलकुल तथ्य नाही.गुजरात व कर्नाटक या दोन राज्याच्या तुलनेत आपले राज्य आर्थिक क्रमवारीत पिछाडीवर गेले आहे.बेरोजगारीचा आलेखही चढत्या कमानीवर आरूढ झाला आहे.ज्या राज्यात सामाजिक व धार्मिक सलोखा नसतो,त्या राज्यात परदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्या आपले प्रकल्प उभारत नाहीत.लाखो कोटी रु.गुंतवणुक करणाऱ्या कंपन्यांना ” अशांत टापू,” कधीही परवडत नसतात.त्यामुळे येणाऱ्या काळात आपले राज्य बेरोजगारीच्या खाईत ढकलले जाण्याची शक्यता आहे.उद्योगधंद्यांची वाढ खुंटली असताना आपल्या राज्यसरकारने सार्वजनिक पैश्याची प्रचंड उधळपट्टी चालवली आहे.राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट निर्माण करणाऱ्या धोकादायक योजना कार्यान्वित करण्याचा धडक कार्यक्रम तीन इंजिनचे सरकार राबवत आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव होईल,अशा भितीमधून सरकार विविध योजना लागू करून खिरापत वाटत सुटलं आहे.लाडक्या बहिणीला जवळ करताना या भावांना शेतकऱ्यांचा मात्र विसर पडला आहे.केंद्र सरकारची कांद्यावर निर्यात बंदी व ४० % निर्यात शुल्क लावण्याच्या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.त्याचा दणका महायुतीला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बसला होता.राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आमची चूक झाल्याचे जाहीरपणे कबुलही केले.पण या ज्वलंत प्रश्नी एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी केंद्राकडे कधी आपली बाजू मांडली नाही.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न व शेतकऱ्यांची पीक विमा योजनेतील बजबजपुरी,इ.प्रश्न प्रलंबित ठेवून सरकार बहिणींना खुश करू पाहत आहे.पण या लाडक्या बहिणी आपल्या शेतकरी पतीची दुःखे विसरून भावाची ओवाळणी स्विकारेल,पण निवडणुकीत मात्र करायचं तेच करेल.सरकारच्या अशा वागण्यामुळे राज्य सध्या आर्थिक खाईत ढकलले जात आहे.सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी जरांगे पाटील यांची ज्या पद्धतीने फसवणूक केली,ती न्यायाला धरून नव्हती.त्यामुळे मराठा समाजही आता पेटून उठला आहे.या समाजाने राजकीय नेत्यांची वाहने अडवणे व त्यांच्या निवासस्थानी मोर्चे नेणे,निदर्शने करणे,असे प्रकार सुरू केले आहेत त्यामुळे आगामी काळात नेत्यांना महाराष्ट्रात फिरणे अशक्य होणार आहे.या सर्व परिस्थितीमुळे महाराष्ट्रात आता अराजक निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.तसं झाल्यास बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ होईल,असा अंदाज अनेक आर्थिक संस्थांनी व्यक्त केला आहे.

