दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नारळ,सुपारी,टोमॅटो व शेण झाले स्वस्त,
स्वर्गात बाळासाहेब नक्कीच अश्रू ढाळत असतील,
मनसे नेते राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यात शिवसेनेने ( उबाठा ) च्या कार्यकर्त्यानी सुपाऱ्यांचा मारा केल्याची घटना नुकतीच घडली होती.त्याचे तीव्र पडसाद काल ठाण्यात उमटले.मनसे सैनिकांनी मेळाव्याच्या निमित्ताने ठाण्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनावर नारळ,शेण,बांगड्या व टोमॅटोचा मारा केला.याप्रकरणी पोलिसांनी २० ते २५ मनसे सैनिकांना अटक केली आहे.महाराष्ट्राचे राजकारण आता मुद्द्यावरून गुद्यावर आले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीकडून सतत ” सुपारीबाज,” आरोप करण्यात येत असतो.महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासाठी काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी आंदोलन छेडले होते,पण राज यांनी हे आंदोलन कालांतराने गुंडाळले.तेव्हापासून त्यांच्यावर विरोधकांनी ” सुपारीबाज,” असा आरोप करण्यास सुरुवात केली.विरोधकांच्या म्हणण्यानुसार राज हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करतात व निवडणुका पार पडल्या की आपले आंदोलन गुंडाळतात.त्यामुळे राज यांची मनसे सतत वादाच्या भोवऱ्यात राहिली.दोन दिवसांपूर्वी ते कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी मराठवाड्यात आले असता,त्यांच्या वाहनावर उबाठा शिवसैनिकांनी सुपारीचा मारा केला.त्यामुळे राज ठाकरे चांगलेच संतप्त झाले.त्यानंतर काल त्या ऍक्शनवर रिऍक्शन झालेली पाहायला मिळाली.या सर्व घडामोडी लक्षात घेता,महाराष्ट्राचे राजकारण आता मुद्द्यावरून गुद्यावर आल्याचे स्पष्ट होत आहे.राजकीय पक्षाच्या अशा वागण्यामुळे लोक आपल्याला संधी देतील,असे जर वाटत असेल तर हे लोक मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत,असेच म्हणावे लागेल.ज्या राज्याची ओळख सुसंस्कृत व सुशिक्षित राज्य अशी आहे,त्या राज्यात अशा घटना घडणे,हे खरंच दुर्देवी आहे.अशा प्रकाराला महाराष्ट्राची जनता कधीच थारा देत नसते.त्यामुळे राज व उद्धव ठाकरे यांनी आपल्या सैनिकांना आवरायला हवे,पण तसं न घडता राज ठाकरे यांनी काल आपल्या सैनिकांना व्हिडियो कॉल करून त्यांचे अभिनंदन केले.या दोघा भावंडांनी आपापसातील भांडणाने आजवर स्वतःचे खूप नुकसान करून घेतले आहे.स्व.बाळासाहेब यांनी अपार कष्ट करून उभारलेल्या पक्षाची अवस्था अशी व्हावी,हे बाळासाहेबांनाही पाहवत नसणार,स्वर्गात ते नक्कीच अश्रू ढाळत असतील.

