दीपक मोहिते,
राजकीय घडामोडी,
लोकसभेची पुनरावृत्ती होईल,अशा भितीतून भाजपची ठाकरेवर चिखलफेक,
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत तीन दिवस मुक्काम केल्या प्रकरणी महायुतीच्या नेत्यांचा सध्या पोटशूळ उठला आहे.उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रीपद देण्यात यावे,अशी याचना सोनिया व राहुल गांधी यांच्याकडे केली,असा अपप्रचार भाजपच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी सुरू केला आहे.हा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद असा आहे.
कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दर पंधरा दिवसांनी दिल्लीचे विमान पकडावे लागते.तर उपमुख्यमंत्री अजित पवार वेषांतर करून व नाव बदलून दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत असतात.त्यांच्या या भेटी,गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकृती व खुशाली विचारण्यासाठी असावी,
असे वाटते.वारंवार दिल्ली गाठणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घ्यावे,हा एक विनोदच म्हणावे लागेल.
दिल्ली हे शहर देशातील राजकारणाचे मध्यवर्ती ठिकाण आहे.प्रत्येक राज्यातील राजकीय नेत्यांना दिल्लीत यावे लागते.पक्षाचे धोरण,पक्षांतर्गत घडामोडी,निवडणुका व निवडणूक काळात तिकीट वाटप,इ.सारे निर्णय येथे होत असतात.त्यामुळे राज्यस्तरीय नेत्यांचे या शहरात सतत येजा सुरू असते.उद्धव ठाकरे हे या आठवड्यात इंडिया गटाचे प्रमुख व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,समन्वयक सोनिया गांधी व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना भेटण्यासाठी कुटुंबासह दिल्लीत आले होते.त्यामुळे भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या पोटात कालवाकालव सुरू झाली व त्यांनी कोल्हेकुई सुरू केली.या कोल्हेकुईच्या मागे महाविकास आघाडीमध्ये आग लावणे,हा एकमेव उद्देश होता.पण तो सफल झाला नाही.महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) या दोन्ही पक्षांनी भाजपच्या या कोल्हेकुईकडे फारसे लक्ष दिले नाही.महाविकास आघाडीतील या तीन प्रमुख पक्षांनी समंजस भूमिका घेत जवळपास ९० टक्के जागावाटप पूर्ण केले आहे.केवळ १० टक्के जागांचा तिढा सांमजस्यपणे सुटावा,यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत.त्यांच्या या प्रयत्नामुळे भाजपच्या गोटात चलबिचल निर्माण झाली आहे व त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चिखलफेक सुरू केली आहे.पण त्याचा कोणताही परिणाम महाविकास आघाडीच्या एकसंघपणावर होणार नाही.

