दीपक मोहिते,
आंतरराष्ट्रीय घडामोडी,
भारताची डोकेदुखी वाढणार,
सध्या बांगला देशात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या लक्षात घेता,जग आता महायुद्धाच्या दिशेने जाऊ लागले आहे.या देशात सध्या जी स्थिती निर्माण झाली आहे,ती भारतासाठी धोकादायक तर आहेच,पण ती येणाऱ्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी आहे.कारण लाखो बांगलादेशीयांचे लोंढे भारताच्या सीमेवर येऊ लागले आहेत.१९७० च्या दशकात पाकिस्तानच्या लष्कराने बांगलादेशीयांवर अनन्वित अत्याचार केल्यामुळे सुमारे दीड कोटी नागरिकांनी आपल्या देशातुन पलायन केले व त्यांनी आपल्या देशात मुक्काम ठोकला होता.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पाकिस्तानविरोधात मोर्चा खोलला होता.भारतीय लष्कराने अवघ्या अकरा दिवसात ढाका काबीज केले.व जनरल नियाझी याना गुडघे टेकून शरणागती पत्करायला लावली होती.त्यावेळी सुमारे ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना आपली शस्त्रे खाली ठेवावी लागली होती.वंगबंधु शेख मुजीबर रहमान यांनी त्यावेळी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान बैचेन झाला होता.आपल्या देशाची सूत्रे बांगला भाषिकांच्या हाती जाणे,त्यांना परवडणारे नव्हते.तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी आपल्या आपल्या अध्यक्षांचे कान भरले व जनरल याह्याखान याना सैन्यासह पाचारण केले.या सैन्याने बांग्लादेशीयांवर प्रचंड अत्याचार केले.त्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी देशातून पलायन केले व ते भारताच्या आश्रयाला आले.त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगला देशात सैन्य धाडले.यावेळी झालेल्या निर्णायक लढाईमध्ये पाकिस्तानच्या लष्कराचा पाडाव झाला व पूर्व पाकिस्तान हा प.पाकिस्तानापासून वेगळा झाला व बांगला देश निर्माण झाला.या पराभवाची सल आजही पाकिस्तानच्या मनात खदखदत आहे.देश स्वतंत्र झाल्यानंतरही बांगला देश गेली पाच दशके स्थिरस्थावर होऊ शकला नाही.शेख मुजीबर रहमान व झिया उर रहमान यांच्या हत्या झाल्या.त्यानंतरच्या काळात शेख मुजीबर रहमान यांच्या कन्या शेख हसीना वाजेद व झिया उर रहमान यांच्या पत्नी खलिदा झिया,या दोघींनी आलटून पालटून सत्ता उपभोगली.गेले दीड दशक शेख हसीना वाजेद सत्तास्थानी होत्या.त्या व त्यांचा अवामी लीग हा कायम भारताचा तर खालिदा झिया यांचा बांगला नॅशनल पार्टी हा पाकिस्तानचा समर्थक राहीला.शेख हसीना शेख आपल्या देशातून परागंदा झाल्यानंतर लष्कराने देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली व लगोलग त्यांनी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या खालिदा झिया यांची तुरुंगातुन सुटका केली.या सर्व घडामोडीमुळे या देशात पाकिस्तान पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.बांगला देशात हिंदूंची लोकसंख्याही लक्षणीय आहे,त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगला देशचे नवनिर्वाचित पंतप्रधान महंमद युनूस यांना हिंदूंच्या सुरक्षिततेबाबत आवाहन केले आहे.या सर्व घडमोडीमुळे निर्वासितांचे लोंढे आता भारताच्या दिशेने येऊ लागले आहेत.

