दीपक मोहिते,
” संवेदना,”
शिंदे यांच्या आश्वासनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित,
गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.या व्यतिरिक्त त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सरकारचा दृष्टिकोन कायम नकारात्मक राहिल्यामुळे तीन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने बेमुदत आंदोलन छेडले होते.त्या आंदोलनात अनेक कर्मचाऱ्यांना आपले जीव गमवावे लागले होते.ते आंदोलन लांबत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संयम सुटला व आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.त्यानंतर सरकारने चर्चेतून मार्ग काढू असे आश्वासन दिले होते,या आश्वासनानंतर कर्मचारी कामावर परतले होते.पण सरकारने त्यावेळी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी ९ ऑगस्ट पासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा दिला होता.ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाचा इशारा दिल्यामुळे शिंदे सरकार खडबडून जागे झाले व मुख्यमंत्र्यांनी संघटनांच्या कृती समिती समवेत संयुक्त बैठक घेतली.या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर कर्मचारी संघटनेच्या कृती समितीने आपला संप मागे घेतला आहे.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास संघटनांची कृती समिती संपाचे हत्यार पुन्हा उपसतील,अशी शक्यता आहे.
या कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.पण या मागण्यामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा वित्तीय भार कसा पेलायचा,याविषयी लवकरच उच्चाधिकार समिती सोबत पुन्हा बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच उत्पन्न वाढीसाठी सरकार २ हजार बसेस खरेदी करणार असल्याचे त्यांनी कृती समितीच्या नेत्यांना सांगितले.या आश्वासनानंतर कामगार संघटनांच्या कृती समितीने संप तूर्तास मागे घेतला आहे.पण सरकारने जर मागण्या मान्य न केल्यास किंवा निर्णय घेण्यास चालढकल केली तर संप अटळ आहे.त्यामुळे सरकारला या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.गणेशोत्सव काळात हा संप झाला तर विरोधी पक्षाला सरकार विरोधात रान उठवण्याची संधी मिळेल व ते विधानसभा निवडणुकीत आपल्याला त्रासदायक ठरू शकेल,म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कृती समितीच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या खालील मागण्यांवर चर्चा झाली.
*राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देणे,
*कामगार कराराच्या तरतुदीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्याची थकबाकी मिळावी,
*घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीची थकबाकी देण्यात यावी,
*सन २०१६ -२०२० या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेल्या ४ हजार ८४९ कोटी रु.मधील शिल्लक रकमेचे वाटप करणे,

