दीपक मोहिते,
बॉटमलाईन,
” महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही,” राज यांचे हे वक्तव्य अंगलट येणार,
आरक्षणाची धुंदी किती वाईट असते,तसेच अशा संवेदनशील विषयी उर्मटपणा केल्यास त्याचे कसे परिणाम भोगावे लागतात,याचा अनुभव मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच घेतला.ते सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.दोन दिवसांपूर्वी ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते,त्या हॉटेलवर जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते राज याना त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गेले होते.या कार्यकर्त्यानी त्यांची भेट मागितली होती.त्यानुसार राज त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या खाली आले.त्यावेळी राज हे त्या कार्यकर्त्यासोबत अत्यंत उर्मटपणे वागले.त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी राज यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.त्यानंतर राज्याच्या अनेक भागात त्याचे तीव्र पडसाद उमटले व अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर,हे दोघे गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करत सुटले आहेत.काल राज ठाकरे यांनी ” महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही,” असे जाहीर वक्तव्य केले.त्यामुळे जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते संतापले व त्यांनी राज ठाकरे ज्या हॉटेलात उतरले होते,ते हॉटेल गाठले.राज ठाकरे हे त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या खाली आले पण चर्चा होण्याऐवजी आंदोलक कार्यकर्ते व राज ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपली.आंदोलकांचा आक्रमकपणा पाहून राज माघारी फिरले.त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्याना चर्चेसाठी आपल्या सुट्मध्ये बोलावले,पण आंदोलकांनी त्यास साफ नकार देत,जोडो मारो आंदोलन सुरू केले.वास्तविक ज्या आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे,अशा संवेदनशील प्रश्नी राज यांनी संयम पाळणे गरजेचे होते.पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा राज यांचा प्रयत्न होता.पण तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला.त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटू लागले आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा मतदारांनी महायुतीच्या अनेक उमेदवारांच्या पाठीला माती लावली होती.लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकणार,अशी सिंहगर्जना करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे विमान जरांगे पाटील यांनी केवळ १७ वर आणून ठेवले.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे तिघे आरक्षणसंदर्भात सध्या अवाक्षर काढत नाहीत.या तिघांचे या प्रश्नी मूग गिळून बसणे,राज ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवे होते.अशावेळी ” महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही,” असं वक्तव्य करून राज यांनी मराठा,ओबीसी,धनगर,
दलित व अन्य समाजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.त्यांचे हे वक्तव्य येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचा कपाळमोक्ष होण्यास कारणीभूत ठरणार आहे,असे दिसते.

