दिपक मोहिते,
बॉटमलाईन,
वायनाड दुर्घटना ; पर्यावरणाचे महत्व वेळीच ओळखा,
केरळ राज्यातील वायनाड या गावात दरड कोसळून सुमारे ३७३ जणांना आपले जीव गमवावे लागले.२२० लोक अद्याप बेपत्ता आहेत,तर २२५ जण गंभीर जखमी झाले आहेत.बचावपथकाने अद्याप शोधमोहीम सुरू ठेवली आहे.निसर्गाकडून अशाप्रकारचा कोप का होतो,यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
यापूर्वी आपल्या राज्यातही माळीण व इर्शालवाडी येथे दरड कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडले होते.ही दोन्ही गावे डोंगर उतारावर वसलेली होती.वायनाड येथे झालेली दुर्घटनाही तशीच आहे.३० जुलै २०२४ ची सकाळ वायनाडवासीयांसाठी दुर्देवी ठरली.या दरडीखाली मेपड्डी व निलांबूर या दोन गावातील अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली व सर्वत्र हाहाकार उडाला.घटनेची खबर लागताच केरळ सरकारने त्वरित बचावकार्य सुरू केल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना वेळीच बाहेर काढता आले.मेपड्डी या गावात चहाच्या मळ्यात काम करणारे असंख्य कामगार आपल्या कुटुंबासह राहत होते.त्यापैकी अनेक कुटुंबे गाडली गेली.अग्निशमन दल,एनडीआरएफ,डिफेन्स कॉर्पस व नौदल यांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरू ठेवले आहे.
यापूर्वी दहा वर्षांपूर्वी ३० जुलै २०१४ रोजी अशीच दुर्घटना घडली होती. आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या परिसरात माळीण वसलं होते.या गावाची लोकसंख्या जेमतेम ८०० च्या आसपास होती.पहाटेच्या सुमारास अचानक डोंगराचा कडा खाली आला व ४४ हुन अधिक घरे गाडली गेली.पुरुष,महिला,लहान मुले,जनावरे,ही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.या भागात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे प्रशासनाला दुर्घटनेची माहिती उशिराने मिळाली.परंतु सर्व यंत्रणांनी भरपावसात सलग सहा दिवस अथक प्रयत्न करून ९ जणांना वाचवले.पण १५१ ग्रामस्थ मात्र या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले.त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला घरातील एकही व्यक्ती जिवंत नव्हता.त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले.
त्यानंतर १९ जुलै २०२३ रोजी इर्शालवाडी या गावात रात्री साडेअकरा वाजता दरड कोसळल्यामुळे येथील आदिवासीपाड्यातील अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.दुसऱ्या दिवशी सकाळी बचावकार्य सुरू झाले.या गावात एकूण ४३ कुटुंबे राहत होती.गावाची लोकसंख्या केवळ २२९ इतकी होती.त्यापैकी २५ जणांचा या घटनेत मृत्यू झाला,सुमारे ८० लोक बेपत्ता होते,तर २१ जण गंभीर जखमी झाले.त्यानंतर आता पाच दिवसांपूर्वी वायनाड येथे ही आणखी एक दुर्घटना घडली.या सर्व घटनानंतर तरी आपण पर्यावरणाचं महत्व समजणार आहोत की नाही,हा खरा प्रश्न आहे.डोंगर उतारावर घरे बांधणे,डोंगराच्या पायथ्याशी मातीउपसा करणे,डोंगरावरील झाडांची बेसुमार कत्तल करणे,अशा कारणामुळे आपल्याला निसर्गाचा कोप अंगावर घ्यावा लागत आहे.काही वर्षांपूर्वी माधव गाडगीळ यांनी केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात डोंगर परिसरातील प्रदेश इको-सेन्सेटिव्ह म्हणून स्पष्टपणे नमूद केले आहे. भविष्यात,अशा घटना घडू शकतात,असा इशाराही दिला होता.पण त्यांच्या अहवालाला अनेक राज्यांनी केराची टोपली दाखवली. आपल्या अहवालात त्यांनी व्यक्त केलेली भिती आता खरी ठरू लागली आहे.भविष्यात माळीण,इर्शालवाडी व वायनाड सारख्या दुर्घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे.जोवर आपल्याला पर्यावरणाचे महत्व कळणार नाही,तोवर असेच बळी जात राहणार.

