दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वाझेच्या पाठीशी असणाऱ्या अज्ञात शक्ती तोंडघशी पडतील,
वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे,पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर अज्ञात शक्ती सक्रिय झाल्या व सचिन वाझे आता पुन्हा पोपटासारखा बोलायला लागला आहे.या सर्व घडामोडी अत्यन्त वेगाने घडल्या,यामागचे कारण काय असावे,असा प्रश्न सर्वानाच पडला असणार,ते कारण जाणून घेऊया.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १५ ऑगस्ट पूर्वी आणखी एक गौप्यस्फोट करणार आहेत.त्यामुळे काही जणांची घाबरगुंडी उडाली व त्यांनी वाझे याला रिचार्ज केले व सचिन वाझे पुन्हा वृत्तवाहिनीवर झळकू लागला.सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,यांच्यावर गंभीर आरोप केले.पण देशमुख यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाची निरीक्षणे असलेली कागदपत्रे फडकवली व वाझेच्या आरोपातील हवाच काढून घेतली.दरम्यान भाजपच्या प्रवक्त्यांच्या टोळधाडीने अनिल देशमुख यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली.पण त्यांचा आक्रस्ताळपणा काही प्रभावी ठरू शकला नाही.दरम्यान खा.संजय राऊत यांनी ” भाजपला सध्या तुरुंगातील कैद्यांचा आधार घ्यावा लागतो,” असा जोरदार हल्ला चढवला.देशमुख यांनी दाखवलेली कागदपत्रे व राऊतांनी केलेला हल्लाबोल,अशा कात्रीत सापडलेल्या गृहमंत्री फडणवीस यांनी ” मी अजून संबधित कागदपत्रे पाहिलेली नाहीत,त्यामुळे सध्या मी या विषयावर बोलणार नाही,” असे सांगत विषयाला बगल दिली.तुरुंगात असलेला एक कैदी,ज्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने ” त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येणार नाही,असे निरीक्षण नोंदवले असताना त्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करा,अशी मागणी भाजपची टोळधाड करते,हे कसलं लक्षण आहे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.एकेकाळी ” पार्टी विथ डिफरन्स,” अशी आरोळी ठोकणारा भाजप दिवसेंदिवस नितीमत्ता गुंडाळून कोणाच्या वळचणीला गेला आहे,ते या सर्व घडामोडीवरून स्पष्ट होत आहे.
