दीपक मोहिते,
हल्लाबोल,
अजित पवार यांच्या संतापाचा कडेलोट,
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,हे आपले वागणं व वाचाळपणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात.त्यांचे वेषांतर करून व नाव बदलून दिल्लीला जाण्यावरून खा.संजय राऊत व खा.सुप्रिया सुळे या दोघांनी त्यांची पळता भुई थोडी केली आहे.खा.सुप्रिया सुळे यांनी तर संसदेत यावर केंद्र सरकारला जाब विचारल्यानंतर अजित पवार यांच्या संतापाचा कडेलोट झाला व त्यांनी आपल्या बहिणीला ” जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा,” सुनावले.अजित पवार हे आपल्या बेलगाम वागण्याने वारंवार वादाच्या भोवऱ्यात का सापडत असतात,असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आहे.लोकसमूह किंवा कार्यकर्त्याचा जमाव पाहून त्यांची जीभ नेहमी कशी काय घसरते ? एक राजकारणी म्हणून त्यांना बोलताना भान का राहत नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडणे कठीण आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही दिवसांपूर्वी यांनी प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या.त्या बैठकांना जाताना,” मी तोंडाला मास्क व टोपी घालून विमानाने जात होतो.हा प्रवास करताना स्वतःचे नाव देखील बदलले होते,” असे ते बोलले.त्यांच्या या वक्तव्याला माध्यमात प्रसिद्धी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे,संजय राऊत,शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत अजित पवार यांना चांगलेच घेरले.त्यामुळे अजित पवार हे अडचणीत आले.पण विरोधकांच्या टिकेवर त्यांनी अवाक्षर काढले नाही.मात्र काल खा.सुप्रिया सुळे यांनी हा विषय संसदेत उपस्थित करत केंद्र सरकारला आपली ओळख लपवून विमान प्रवास करता येतो का ? या संदर्भांत आपले धोरण काय ? अशी विचारणा केली.यावेळी सुळे यांनी केलेल्या मुद्देसूद भाषणाने लोकसभेचे सभापती ओम बिर्ला देखील प्रभावित झालेले पाहायला मिळाले.सुळे यांनी हा प्रश्न सुरक्षेशी निगडित असून सरकारने यावर सविस्तर खुलासा करावा,अशी मागणी केली.त्यामुळे आता अजित पवार पार हडबडून गेले व त्यांनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.आपल्या बहिणीने लोकसभा निवडणुकीत आपल्या पत्नीचा पराभव केल्यानंतर काही दिवस अजित पवार खूप दिवस सार्वजनिक जीवनापासून लांब राहिले होते.कालांतराने त्यांना आलेले नैराश्य संपुष्टात आले व ते पुन्हा सक्रिय झाले.त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मागच्या दारातून राज्यसभेवर पाठवण्यात आल्यानंतर त्यांचा सर्वत्र वावर सुरू झाला.त्यांना नैराश्य येणे साहजिकच आहे,कारण काही वर्षांपूर्वी मुलाचा व आता पत्नीचा पराभव होणे,त्यांना आता परवडणारे नव्हते.पण मतदारांनी ते केले.या सर्व घडामोडीनंतर तरी त्यांच्या वागण्यात बदल होईल,असा अंदाज होता.पण ” नेमेची येतो पावसाळा,” युक्तीनुसार पुन्हा ते बरळले व अडचणीत आले.त्यांचे हे असं वारंवार का होत असते ? या प्रश्नाचे उत्तर आहे,” अंगी असलेला उर्मटपणा व वाचाळपणा,” होय.कार्यकर्ते किंवा पत्रकार असोत,त्यांच्याशी बोलताना,आपण काय बोलतोय,आणि त्याचे काय परिणाम होतील,याचे त्यांना भान राहत नाही.त्यानंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर बोलतानाही ते पुन्हा तीच चूक करतात.त्यांच्या या अशा स्वभावामुळे पक्षातील अनेक नेते देखील नाराज आहेत.त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या नाराज असून ते कोणत्याही क्षणी शरद पवार यांचा तंबू गाठण्याची शक्यता आहे.आज अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत,पण छगन भुजबळ हे त्यांच्या दौऱ्याकडे फिरकले देखील नाही.त्यांच्या या उर्मटपणाला भाजपचे कंटाळले असून अनेक आमदार हे यांची ” संगत नको रे बाबा,” अशा निर्णयाप्रत आले आहेत.दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्याजाणत्या नेत्यांनीही त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे,ही चूक होती,त्यामुळे राज्यात महायुतीला जबरदस्त फटका बसल्याचे त्यांच्या ” ऑर्गनायझर,” या मुखपत्रामध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे.

