पालघर,
उद्या व परवा पालघरच्या समुद्रात महाकाय लाटा उसळणार,
राज्याच्या महाराष्ट्र सागरी मंडळाने डहाणू,सातपाटी,केळवे-
माहीम,अर्नाळा व वसई येथील समुद्रात सलग दोन दिवस प्रचंड लाटा उसळतील असा इशारा दिला आहे.त्यामुळे या समुद्रकिनारी असलेल्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे निर्देश असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
पालघर जिल्ह्यात सरासरी अडीच ते तीन हजार मि.मी. पाऊस पडतो.यंदाही जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला.मुसळधार वृष्टी झाली कि समुद्रातील वातावरण वादळी होत असते.वेगाने वारे वाहणे व प्रचंड उंचीच्या लाटा उसळणे,असे प्रकार सतत घडत असतात.यंदाही सातपाटी व डहाणूच्या समुद्रात सलग दोन दिवस ( ४ व ५ ऑगस्ट ) दुपारी १.०० ते ३.०० च्या दरम्यान ५.२० मी.उंचीच्या लाटा उसळतील,असा इशारा देण्यात आला आहे.या दोन दिवसात मच्छिमार व स्थानिक रहिवाश्यानी समुद्रकिनारी भागात जाऊ नये,असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच केळवे-माहीम,अर्नाळा व वसई,या तीन समुद्रकिनारीही ४.९० मी.उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.काही वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्याच्या दक्षिणेस अनेकदा महाकाय लाटा आदळून अनेक मच्छीमारांच्या राहत्या घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होत.मात्र मेरीटाईम बोर्डाने आजवर कोणतीही उपाययोजना केली नाही.अर्नाळा समुद्र हळूहळू गावाच्या दिशेने सरकू लागला आहे.काही वर्षांपूर्वी बाजूलाच असलेल्या कळंब गावातही समुद्राचे पाणी शिरून कलिंगडाचे क्षेत्र लयाला गेले.आता तोच प्रकार इतर समुद्रकिनारी होऊ लागल्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

