भुईगावला समुद्र गिळंकृत करणार,
ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण,
दीपक मोहिते,
-
वसई तालुक्याच्या पश्चिमेस समुद्रकिनारी असलेल्या भुईगाव येथे पर्यटक, पक्षीप्रेमीसाठी खूप प्रसिद्ध आहे.सागरी उत्पादनावर अभ्यास करणारे संशोधक भुईगाव समुद्र किनाऱ्याला पहिली पसंती देत असतात.पर्यटनसोबतच भुईगावला समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात भात, चवळी,गवार,वाल,दुधी आदी शेती करण्यात येते.
पर्यटक व शेतकरीसाठी प्रसिद्ध असलेला निसर्गरम्य भुईगाव समुद्र किनारा हा हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
२५ वर्षांपूर्वी शासन व गावकरी यांच्या प्रयत्नाने या समुद्रकिनारी १२ हजाराहून अधिक सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली होती.सुरुच्या सुंदर बागेमुळे किनाऱ्याची होणारी धूप रोखणे,सोबत समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडत होती.परंतु मागील २-३ वर्षापासून प्रचंड भरती व किनारपट्टी भागात वाढत असलेली अतिक्रमणे,यामुळे समुद्राचे पाणी शेती व सुरुच्या बागेत शिरू लागले आहे.सुरुची ५ हजाराहून अधिक झाडे भरतीच्या पाण्याच्या लाटांमुळे उध्वस्त झाली.गेल्या काही दिवसात झालेला मुसळधार पाऊस व प्रचंड भरती,यामुळे शेकडो झाडाचा खच भुईगाव समुद्र किनारी पडला आहे.सुरुची झाडाची झालेली पडझड
भुईगावच्या समुद्र किनारी भेट देणारे पर्यटक,गावकरी व पर्यावरण प्रेमी यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून भुईगावच्या समुद्रकिनारी संरक्षक बंधारा बांधण्यात यावा,अशी मागणी केली आहे.या ज्वलंत प्रश्नी तहसीलदार,प्रांत,महानगर पालिका,जिल्हाधिकारी, मेरीटाईम बोर्ड,यांच्याकडे ते सतत पाठपुरावा करत आहेत.परंतु कोणीही त्यांची दखल घेतली नाही.कालांतराने या भागात राहणारे हजारो गावकरी,शेतकरी, मच्छीमार यांच्यावर अस्मानी संकट कोसळू शकते.
हवामान बदल,समुद्रात वाढत्या भरावासोबत वाढवण येथे समुद्रात ५ हजार एकर जमिनीवर झालेला ३० फूट खोल भराव,यामुळे भुईगाव, रानगाव,अर्नाळा ही गावे पुढील काळात समुद्र गिळंकृत करेल,अशी भिती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून त्वरित या समुद्रकिनारी संरक्षक बंधारा बांधावा अशी मागणी भुईगाववासीयांनी केली आहे.

