पालघर,
- रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नायगाव येथे रिक्षाचालकांचा रास्ता रोको,
नुकत्याच झालेल्या मुसळधारवृष्टीत वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.” रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते,” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यासंदर्भात संबधित विभागाचे अधिकारी कोणत्याही उपाययोजना करत नसल्यामुळे आज नायगाव येथे रिक्षाचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
वसई तालुक्यात विरार,नालासोपारा,वसई व नायगाव,या शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून या सर्व रस्त्यावरून वाहतूक करणे, दिवसेंदिवस धोकादायक झाले आहे.अनेक भागात अपघात होऊनही रस्ते विकास,महानगरपालिका व सार्व.बांधकाम विभागाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत.त्यामुळे नागरिक व रिक्षाचालकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.आज नायगाव येथे या असंतोषाचा स्फोट झाला.नायगाव-बाफाणे दरम्यान रस्त्याची पार दुर्दशा झाल्यामुळे येथील रिक्षाव्यवसायावर त्याचा चांगलाच परिणाम झाला आहे.त्यामुळे संतापलेल्या रीक्षाचालकांनी आज नायगाव पूर्व भागात रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.याच आठवड्यात कामण-अंजुरफाटा या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात देखील ग्रामस्थ मोठे
आंदोलन उभारणार आहेत.हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असून आजवर अनेक दुचाकीस्वारांचे अपघातात बळी गेले आहेत.पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुरुस्तीचे काम हाती घेत नाहीत.

