दीपक मोहिते,
नवापूर दुर्घटना ; सातजण अटकेत तर अनेकांवर गुन्हे दाखल,प्रशासन अलर्ट मोडवर,गावात वातावरण तंग,
काल नवापूर येथे घडलेल्या घटनेनंतर संबधित रिसॉर्टस जमीनदोस्त करण्यात आले आहे.पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावातील तरुणांवर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.काल रात्रभर झालेल्या तोडक कारवाईमुळे गावात तंग वातावरण निर्माण झाले होते.सरकारच्या या कारवाईच्या विरोधात महिलांनी प्रचंड आक्रोश सुरू ठेवला आहे.
सेव्हन सी बीच या रिसॉर्टसवर झालेली तोडक कारवाई तब्बल १६ तास सुरू होती आणि ती पहाटे तीनच्या सुमारास आटोपली.या कारवाईमुळे रिसॉर्टसमालकाचे ५ कोटी रु.चे नुकसान झाले.तर या रिसॉर्टसमध्ये काम करणाऱ्या सुमारे १५० कुटुंबाचा रोजगार नाहीसा झाला आहे.सरकारने केलेली तोडक कारवाई चुकीची असून आम्ही महिला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचे या कुटुंबातील महिलांनी सांगितले.
ठाण्याचे उपशहरप्रमुख मिलिंद मोरे हे आपल्या कुटुंबासमवेत नवापूर येथील सेवन सी बीच,या रिसॉर्टसमध्ये आले होते. दिवसभर मौजमजा केल्यानंतर ते घरी परतत असताना त्यांच्या कुटुंबातील एका मुलाला रिसॉर्टसच्या गेटवर रिक्षाने धडक दिली.त्यावरून झालेल्या किरकोळ भांडणात रिसॉर्टसमधील कामगारांनी मिलिंद मोरे याना जबर मारहाण केली,या मारहाणीमुळे मिलिंद याना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले.पोलिसांनी घटनास्थळी येऊन सात जणांना अटक केली व अन्य दहा ते पंधरा जणांवर गुन्हे दाखल केले.या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.घटनेनंतर हे रिसॉर्टस जमीनदोस्त करण्यात आले.त्यामुळे या भागातील वातावरण तंग झाले आहे.या घटनेला कारणीभूत असलेल्याना अटक व अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर अशाप्रकारची तोडक कारवाई करणे,हे अन्यायकारक असून आम्ही याप्रकरणी आंदोलन करणार असल्याचे अनेक महिलांनी सांगितले.आज दिवसभर नवापूर गावात महिलांचा आक्रोश सुरू होता.अन्य रिसॉर्टसवरही अशीच तोडक कारवाई होईल,अशी भिती रिसॉर्टसमालक व्यक्त करत आहेत.

