दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मास्क व टोपीची एक सुरस कहाणी,
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली.हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले.तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.या प्रलयाला चार दिवस उलटल्यानंतरही अद्याप पुणे सावरलेले नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री ” वराती मागून घोडे,” या म्हणीप्रमाणे आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा सोबत घेऊन परिस्थितीची पाहणी करत आता फिरत आहेत.वास्तविक त्यांनी पावसाचा जोर लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवायला होती.तीन निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी जाणे,हे पालकमंत्री म्हणून अजित पवार,खा.मुरलीधर मोहोळ,जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्याचे दारुण अपयश आहे,असं म्हंटल्यास ते वावगं ठरू नये.त्यामुळे या नैसर्गिक संकटात पुणेकरांचे जे हाल व त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले,त्यास हीच मंडळी सर्वस्वी जबाबदार आहे,असं म्हंटल्यास ते वावगं ठरू नये.
अशा दुःखद प्रसंगी पालकमंत्री तोंडाला मास्क लावून टोपी घालून देशाच्या गृहमंत्र्यांना मी कसा भेटत होतो,अजित पवार या नावाने नव्हे तर ए.ए.पवार या नावाने विमानाची बुकिंग करत होतो,अशा सुरस कथा सांगत सुटले आहेत.असा पालकमंत्री आपल्या नशिबी असणे,हे खऱ्या अर्थाने पुणेकरांचे दुर्देव आहे.त्यामुळे काल राज ठाकरे यांनी या पालकमंत्र्याला बाळसाहेबांच्या भाषेत चांगल्याच कानपिचक्या दिल्या.राज म्हणाले,पालकमंत्री पुण्यात नव्हते तर धरणातील पाणी वाहले कसे ? किती अर्थपूर्ण व मिश्किल प्रश्न राज यांनी विचारला आहे.त्यांच्या या मिश्किल प्रश्नात अजित पवार यांची राजकीय कारकीर्द दडली आहे.अजित पवार यांनी दहा वर्षांपूर्वी ” धरणात पाणी नाही,तर काही मुतायचं का ? ” असा प्रश्न शेतीसाठी पाणी मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना विचारला होता.त्यांचे हे वाक्य आजही त्यांची पाठ सोडत नाही.जो माणूस स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाही,स्वतःच्या पत्नीला आपल्या होमग्राउंडवर विजयी करु शकत नाही,तो राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहतो,ही खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाही व्यवस्थेची क्रूर चेष्टाच आहे असे म्हणावे लागेल.

