पालघर,
- गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी,
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १४४७.९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.गेल्या वर्षी १८०८.३ मि.मी.पाऊस पडला होता.
गेल्या पंधरा दिवसापासून सलग पडणाऱ्या पावसाने काल दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळी पुन्हा हजेरी लावली.सकाळी दोन तास पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले.जिल्ह्यातील वैतरणा धरण सोडल्यास धामणी,मोडकसागर ही धरणे,कवडास,वांद्री हे बंधारे,विरार पूर्वेस असलेली उसगाव व पेल्हार ही छोटी धरणे तुडुंब भरली.तर सूर्या, पिंजाळ व देहर्जे या नद्यांच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे.काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.पुन्हा जोरदार वृष्टी झाल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने या नद्यांच्या काठी असणाऱ्या गावातील रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.धरणाचे दरवाजे उघडले कि डहाणू,पालघर व विरार पूर्व भागातील गावामध्ये पाणी घुसते व सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होते.दरम्यान येत्या तीन दिवसात पुन्हा जोरदार वृष्टी होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या पावसाने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे,शेतकऱ्यांनी शेतीची ८५ % कामे पूर्ण केली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

