दीपक मोहिते,
पुणेकर,आगामी विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवतील,
राज्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला आहे.शहरी भागातील जनजीवन तर पार विस्कळीत झाले आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईच्या कामाची पाहणी करणारे नेतेमंडळी आता गायब झाले आहेत.राज्याची नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा पार ढेपाळली असून पुणे शहर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.मुख्यमंत्र्यांचे ठाणे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नागपूर शहर देखील याच रांगेत आहे.
पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार काल पुणे महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षात आले होते.त्यांनी ऐटीत बसत पुण्यातील पूरपरिस्थिती पाहीली.या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या.ते आपल्या प्रतिक्रियेत काय म्हणाले ते पहा,ते म्हणाले ” शहरात वाटेल तशी बांधकामे झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यांचे हे म्हणणे अगदी खरं आहे,पण या बांधकामांना परवानग्या देणाऱ्या महानगरपालिकेत सत्ता कोणाची आहे ? आज शहरात वेडीवाकडी बांधकामे झाली म्हणून नाकाने कांदे सोलता,पण त्याला जबाबदार कोण ? त्यामुळे ही नौटंकी बंद करा,अशी मागणी संतापलेल्या पुणेकरानी केली आहे.पुणे शहरातील बिल्डरलॉबीला पाठीशी कोण घालतय ? अगरवाल सारख्या नामचीन बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी मध्यरात्री कोणत्या पक्षाचा आमदार पोलीस ठाण्यात गेला होता ? पुण्यातील बिल्डरलॉबी आणि राजकारणी यांचे नाते किती घट्ट आहे,हे आजवर घडलेल्या अनेक घटनांवरून पाहायला मिळाले आहे.पुण्यातील बिल्डर्सनी नदी-नाले बुजवून बांधकामे उभारली आहेत,ती राजकारणी लोकांच्या पाठबळाशिवाय उभीच राहू शकत नाहीत.त्यामुळे अजित पवार यांनी पुणेकरांना दुधखुळे समजू नये.जाता जाता त्यांनी ” पुणेकरांनी घाबरून जाऊ नये,सर्वाना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल,” असे सांगितले.एकीकडे लोकांना दुःखाच्या खाईत ढकलायचे आणि दुसरीकडे घाबरू नका,आम्ही आहोत,सांगत मलमपट्टी करायची,हे नक्कीच शोभदायक नाही.पुणेकर नागरीक सोशीक आहेत,पण संधी मिळाली कि ते राजकारण्यांना चांगलाच हिसका दाखवतात,त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची संधी सोडतील असे वाटत नाही.

