दीपक मोहिते,
जरांगे पाटील यांचे आंदोलन दिवसेंदिवस क्षीण होतेय,
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनातील बरीच हवा निघून गेली आहे.आंदोलन करायचे व अवघ्या काही दिवसात ते मागे घ्यायचे,असे सतत होत गेल्यामुळे लोक पार कंटाळून गेले आहेत.आता त्यांच्या आंदोलनाची सरकार देखील फारशी दखल घेत नाही.मी ” एवं करेन,मी त्यवं करेन,” अमुक अमुक तारखेला बॉम्ब फोडीन,अशा गर्जना करायच्या व प्रत्यक्षात काही करायचे नाही,असे सतत होत गेल्यामुळे त्यांच्यासमवेत असणारे त्यांचे साथीदार देखील त्यांच्यापासून आता दुरावत चालले आहेत.
त्यांचे उपोषण,मोर्चा व अन्य आंदोलनाची राज्य सरकारला भिती वाटेनाशी झाली आहे.आंदोलन सुरू करायचं आणि काही दिवसात ते मागे घ्यायचे, असे सतत होत गेल्यामुळे राज्यसरकारने त्यांचे पाणी जोखले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगे पाटील यांचा प्रभाव कमी होत असल्याचे पाहून ओबीसी नेते गणेश हाके व छगन भुजबळ यांना त्यांच्या अंगावर सोडले.त्यामुळे सरकार आता सगेसोयरेना आरक्षण व ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण, या दोन्ही मागण्या मान्य करेल,असे वाटत नाही.आता तर सरकारने जरांगे पाटील यांच्यावर दहा वर्षांपूर्वी दाखल असलेले प्रकरण उकरून काढले आहे.याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.त्यामुळे जरांगे पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.त्यांच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या इतर मराठा संघटनांचे पदाधिकारी आता त्यांच्या आंदोलनाकडे फिरकत नाही.सुरुवातीच्या काळात त्यांच्या आंदोलनाला मराठा समाजाचा उत्स्फूर्त पाठींबा व सहकार्य मिळत होते,तेही आता कमी झाले आहे.

