दीपक मोहिते,
वसई-विरारकर बेहाल,
वसई-विरारकर नागरिक गेल्या दोन दिवसापासून हलाखीचे जीवन जगत आहेत.वसई तालुक्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.नालासोपारा पूर्व भागात गोरगरिबांच्या घरात पाणी घुसले आहे.व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून त्यांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.१०० % नालेसफाई केल्याचा दावा करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त व त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रु.कोणाच्या घश्यात घातले ? याचा जाब विचारण्याची पाळी सध्या करदात्यावर आली आहे.
दरवर्षी पाऊस पडला की या महानगरपालिका हद्दीतील लाखो नागरिक,व्यापारी व भाजीविक्रेते यांचा जीव टांगणीला लागतो.नालेसफाई न करता ठेकेदारांच्या घश्यात पैसे घालणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी आता या महानगरपालिकेतून चालते व्हायला हवे.” यंदा पाऊस खूप पडला,त्यामुळे पाणी साचले,”असे निर्लज्जपणे उत्तर देणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांनी तोंडाला काळे फासून येथून चालते व्हावे,अशा निर्णयाप्रत करदाते आले आहेत.या महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार डबघाईला आला असून ” कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही,” प्रतिनियुक्तीवर आलेले मंत्रालयातील अधिकारी हे केवळ आपले खिसे भरत आहेत.दर पावसाळ्यापूर्वी आयुक्त विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेत असतात.या आढावा बैठकीत नेमके काय निर्णय होतात व त्यानंतर घेतलेल्या निर्णयाची कशी अंमलबजावणी होते ? ते त्या परमेश्वरालाच माहीत.त्यांना विचारणारे कोणी नसल्यामुळे या महानगरपालिकेत सध्या अंदाधुंद कारभार सुरू आहे.

