दीपक मोहिते,
जिल्ह्याच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा,
पालघर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या,बंधारे व धरणे,तुडुंब भरली आहेत.जिल्हा प्रशासनाने सूर्या व तानसा नद्यांच्या परिसरात असणाऱ्या अनुक्रमे ६५ व ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सूर्या नदीचे पाणी सतत वाढत असल्यामुळे या नदीला पुर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जिल्ह्यात सलग चार दिवस तुफान वृष्टी झाल्यामुळे धामणी व तानसा ही दोन्ही धरणे पूर्णपणे भरली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धामणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाणी सूर्या नदीत सोडण्यात येत आहे.सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दोन दिवसापूर्वी तानसा धरणही ओसंडून वाहू लागल्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.त्यामुळे आपात्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यात एनडीआरएफ दल व तैनात करण्यात आले आहे.तर अन्य शासकीय यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान सुर्या नदीच्या पाण्यात सतत वाढ होत असल्यामुळे या नदीला कधीही पूर येऊ शकतो,त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

