दीपक मोहिते,
मच्छीमारांच्या विविध समस्यांवर बैठक संपन्न,
- राम नाईक,माजी राज्यपाल उत्तर प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली सुधीर मुनगंटीवार मंत्री,वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात मत्स्योद्योग विकास धोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली.
यावेळी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आ.राजेश पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांचे व मत्स्यशेती करणा-यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले.त्यांच्या विविध समस्यांचा पाढा त्यांनी मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत वाचला.त्यांच्या रास्त मागण्यांना न्याय देण्यासाठी व जातीने या विषयी लक्ष घालण्याचे आश्वासन संबधित मंत्र्यांकडून मिळवले.
मच्छिमार बांधवांना निधी व सोयीसुविधा देताना इतर जिल्ह्यापेक्षा पालघर जिल्ह्यावर अन्याय करण्यात येतो,याकडे आ.राजेश पाटील यांनी मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. तसेच पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणारी काही बंदरे ही किनाऱ्यावर साचणा-या गाळामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पालघर तालुक्यातील दातिवरे या गावातील बोटी किनाऱ्यावर नांगरण्यात येत असतात.पण गाळ साचल्यामुळे त्या कायमच्या बंद झाल्या आहेत.एकेकाळी ५० ते ६० मोठ्या नौकाचा या बंदरावर वावर असायचा,आज ते प्रमाण फार कमी झाले आहे,अशावेळी त्वरित निधी उपलब्ध करून सातपाटी,मुरबे,दातिवरे येथील बंदराचा गाळ काढण्यात यावा.
तसेच अवकाळी पावसामुळे यावर्षीही मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे सुकी मच्छी खराब झाली आहे.मच्छीमारांचे जे नुकसान झाले आहे,त्याबद्दल नुकसान भरपाई व अनुदान स्वरुपात देऊन मच्छिमारांना दिलासा द्यावा.पालघर सातपाटी येथे आधुनिक घाऊक बाजार केंद्र मच्छिमारांना उपलब्ध व्हावे.तालुका व गावपातळीवर अद्ययावत किरकोळ बाजार शेड किंवा केंद्र बनवण्याच्या कामाला आपल्या खात्याकडून प्राधान्य देण्यात यावे,अशी मागणी केली.
जेटीवरील प्रवासी शेड, शौचालय या मुलभूत सोयी सुविधांबरोबरच,मासे सुकवण्यासाठी चौथरे, जाळी विणण्यासाठी शेड यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा व त्वरित त्याचे काम हाती घ्यावे,अशा सूचना आ.राजेश पाटील यांनी केल्या.तसेच धुपप्रतिबंध बंधाऱ्यांची कामे बऱ्याच वर्षापासून रखडली आहेत, ती त्वरित सुरू करण्यात यावीत,अशी मागणी त्यांनी केली.मच्छिमार समाज हा प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यावर वास्तव्य करून आपला उदरनिर्वाह चालवत असतो.मात्र तो राहत असलेली जागा आजही त्यांच्या नावावर नाही.थोडक्यात तो आज बेघरच आहे.तेव्हा मच्छिमार राहत असलेली व त्यांच्या वापरात असलेल्या जागेचा ७/१२ त्वरित मच्छिमारांच्या नावावर होणे गरजेचे आहे. परिणामी त्याला आपल्या हक्काचे घर मिळेल आणि यासाठी शासनाने त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे असे आ.राजेश पाटील यांनी मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.
” पापलेट,” या माश्याला ” राज्यमासा,” म्हणून मान्यता मिळाली असली तरी इतर मत्स्योत्पादनाचे संवर्धन होणे गरजेचे आहे.पालघर जिल्ह्यातील मच्छिमार हे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत असून ते बंदीकाळाचे काटेकोरपणे पालन करतात.मात्र मत्स्य बंदी काळात धनदांडगे व परराज्यातून होणा-या काही टोळक्यांंकडून अनधिकृत व अपारंपरिक पद्धतीने मासेमारी करत असतात.त्यांना मज्जाव करण्यासाठी खोल समुद्रात गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे,तसेच कठोर दंडात्मक कारवाई म्हणून त्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद करण्यात यावी, असेही आ.राजेश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.या मत्स्यबंदीच्या काळात मच्छिमारांना अनुदान देऊन त्यांना दिलासा द्यावा,अशी विनंती केली.पालघर जिल्ह्यात मस्त्य शेती करणारे व मिठागरे जोपासणारा वर्गही मोठा आहे.त्यांच्या जागा खालसा करण्याचा विचार शासनदरबारी होत आहे. तेव्हा त्यांचे उपजिविकेचे साधन काढून न घेता त्यांच्या भाडेकरारात वाढ करावी किंवा गरज पडल्यास त्यांच्या नावे कायम करून त्यांना अर्थसहाय्य द्यावे.खारेकुरण व इतर मच्छिमार संस्था वर्षानुवर्षे कोळंबी संवर्धन करत आहेत.त्यापैकी अनेक व्यवसायिकांचा भाडेकरार संपत आला आहे.त्यांचा भाडेकरार वाढवून देऊन मसंस्थांच्या उन्नती आणि विकासासाठी शासनाने प्रथम प्राधान्य द्यावे,अशी मागणी आ.राजेश पाटील यांनी केली.या सर्व प्रकरणी मत्स्यव्यवसायमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जातीने लक्ष घालुन मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत,शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि सहकारी आमदार महोदय उपस्थित होते.

