दीपक मोहिते,
मातीचे बंधारे ; सरकारचे अपयश,
ग्रामीण भागातील अनेक गावात आजही आपल्याला मातीचे बंधारे पाहायला मिळतात.वास्तविक सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारचे हे अपयश आहे.एकीकडे आपण डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहतो,तर दुसरीकडे ग्रामीण भागात अशी अवस्था….अतिवृष्टी झाली की या मातीच्या बंधारातील माती ढासळते आणि गावच्या गावे उध्वस्त होतात.
हे वर्षानुवर्षे चालत आले आहे,गेल्या पाऊणशे वर्षात आपण मातीच्या बंधाऱ्याचे सिमेंट-काँक्रीटच्या बंधाऱ्यात रूपांतर करू शकलो नाही आणि आज आपले राज्यकर्ते ” आत्मनिर्भर भारत ” चे स्वप्न आपल्याला दाखवत आहेत.चार वर्षांपूर्वी मातीचा बंधारा फुटून गाव उध्वस्त झाल्याची घटना घडली होती.त्यावेळी आपले नेते खेकड्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे झाले होते.खेकड्यानी बंधाऱ्यांची माती उकरल्यामुळे हे संकट कोसळले,असा जावईशोध संबधित मंत्र्याने लावला होता.आजवर अशा अनेक
दुर्घटना घडून त्यामध्ये निष्पाप गोरगरीब जनतेचे बळी गेल्यानंतर गळे काढणाऱ्या राज्यकर्त्यांचा हा करंटेपणा आहे.दरवर्षी अर्थसंकल्पात योजनांचा वर्षाव होत असतो,पण ग्रामीण भागातील मातीच्या बंधाऱ्यांचे कॉन्क्रीटीकरण मात्र होऊ शकत नाही.आजही राज्याच्या ग्रामीण भागात हजारो बंधारे मातीचे आहेत.पण ते सुस्थितीत राहावेत,त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न झाले पाहिजेत,असे ” धरणात पाणी नाही,तर आम्ही मुतायचे का ? ” असे विचारणाऱ्या हायफाय नेत्यांना वाटत नाही.

