दीपक मोहिते,
कोकण रेल्वेचे आरक्षण अवघ्या दहा मिनिटात हाऊसफुल्ल,
दलाल व रेल्वे कर्मचाऱ्याची मिलीभगत,
सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेवर दलालांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.कोकण रेल्वेचे बुकिंग सुरु होताच अवघ्या दहा मिनिटात कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले.त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता खाजगी बसेसचा आधार घ्यावा लागणार आहे.खाजगी बस ऑपरेटर देखील आता लुटीच्या तयारीत आहेत.
यंदा मध्य रेल्वेने मुंबई-कोकण दरम्यान गणेशोत्सवासाठी २०२ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्याच्या आरक्षणास कालपासून सुरुवात करण्यात आली.सकाळी आठच्या सुमारास बुकिंगला सुरुवात होताच अवघ्या दहा मिनिटात आरक्षण हाऊसफुल्ल झाले.त्यामुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.दलालांनी या बुकिंगवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला असून रेल्वे बुकिंग कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय हे दलाल अशी करामत करू शकत नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.दरवर्षी हा प्रकार घडत असल्यामुळे सरकारने याची सखोल चौकशी करून या साखळीत सहभागी असलेल्यांवर कारवाई करावी,अशी मागणी अनेकांनी केली आहे.गेल्या वर्षी रेल्वेने केलेल्या चौकशीत अनेक तिकीट आरक्षण खाती बोगस असल्याचे उघडकीस आले होते.यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाल्यामुळे प्रवासी संघटना संतप्त झाल्या आहेत.गेल्या वर्षी कोकणकन्या एक्स्प्रेसचे आरक्षण अवघ्या दोन मिनिटात हाऊसफुल्ल झाले होते.या प्रकरणी रेल्वे बुकिंग कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व दलाल यांची मिलीभगत असल्याचा संशय अनेक प्रवासी संघटनांनी केला आहे.बोगस बुकिंगचे हे प्रकरण सरकारने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय ) देण्यात यावे,अशी मागणी केली आहे.

